एकरी शंभर टन ऊस उत्पादनावर कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

पुणे : “साखर- टास्क फोर्स कोअर कमिटी” ने पुण्यामध्ये “100 टन/एकरी ऊस व 75 टन/एकरी खोडवा उद्दिष्टे” ह्या विषयावर कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती. चोहीकडे अतिवृष्टी स्थिती असतानादेखील ‘टास्क फोर्स’चे सदस्य दूरदूरवरून आले होते.
सुरुवातीला श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दत्ताराम रासकर यांनी प्रास्ताविक करताना “साखर- टास्क फोर्स कोअर कमिटी” च्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगून आजच्या चर्चामंथनचे उद्दिष्ट सांगितले.
फोरम ऑफ इंटलेकच्युअल्सचे अध्यक्ष श्री. सतीश देशमुख यांनी सांगितले की, साखर ऊद्योगापुढील आव्हाने, शेतकऱ्यांचे हित व आर्थिक उन्नतीसाठी, ऊस तोड कामगार, कर्मचारी ह्या सर्व स्टेक होल्डर्स चा सर्वांगीण विचार करण्यासाठी हा टास्क फोर्स कार्यरत असतो. तो नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मंथन करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र / राज्य सरकार कडे पाठपुरावा करीत असतो. आजपर्यंत साखरेसाठी द्विस्तरीय भाव, इथेनॉलचा एफआरपीवर होणारा परिणाम, ठिबक सिंचनाची वाढ वगैरे विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली होती.
त्यांनी असेही नमूद केले की, आजच्या परिस्थितीमध्ये साखर तयार करणे म्हणजे एक उपपदार्थ, बाय प्रॉडक्ट झालेला आहे. या उद्योगाचे ऊर्जा क्षेत्रात झपाट्याने रूपांतर होत आहे. उदाहरणार्थ इथेनॉल निर्मिती, बायोगॅस, बायो सीएनजी, सॉलिड कार्बन डाय-ऑक्साइड (ड्राय बर्फ), कोजनरेशन, ग्रीन हायड्रोजन अशी अनेक मुख्य उत्पादने होत आहेत. केंद्र सरकारच्या “नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन” प्रमाणे 2030 पर्यंत देशांमध्ये 60 लाख मॅट्रिक टन प्रति वर्ष इतके हरित हायड्रोजनचे उत्पादन होणार आहे. त्यापैकी 10 लाख मेट्रिक टन हायड्रोजन उत्पादनामध्ये साखर उद्योगाचा सहभाग असणार आहे.
‘उसाची उत्पादकता वाढ’ ह्या विषयावर मार्गदर्शन करताना कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी सांगितले की, जमिनीची सुपीकता, लागण पध्दत, रासायनिक व सेंद्रिय खतांच्या मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन व पीक संरक्षण हया पंचसूत्रांचा अवलंब केला पाहिजे. त्यांचा 1997 पासून सुरु असलेल्या संशोधन प्रक्रिया, अथक प्रयोग, प्रयत्न व मिळालेल्या यशाचा उल्लेख करून त्यांनी सखोल आकडेवारी सकट माहिती दिली.
श्री. माने यांनी ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच विविध तज्ञ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या शेतातील ऊसाचे उत्पादन टप्प्या टप्प्याने वाढवित प्रति एकर 168 टना पर्यंत नेले. त्यांनी सर्व गुरूंचा आवर्जून उल्लेख केला.
त्यांचे हे बहुमोल कार्य पाहुन श्री. सतीश देशमुख यांनी त्यांना “बांधावरचा कृषिशास्रज्ञ” ही उपाधी बहाल करून गौरवपूर्ण उल्लेख केला. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून संमती दिली.
श्री. राजकुमार धुरगुडे पाटील (अध्यक्ष, ‘ॲग्रो इनपुटस् मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’) यांनी खतांचा संतुलित वापर या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणात त्यांनी लहानपणापासून आढावा घेत, वडिलांच्या दूरदृष्टी संस्काराचे व शिक्षणाचे महत्व, त्यातून निर्माण झालेली सामाजिक जाणीव, यशस्वी व्यवसायाची भरारी तसेच त्यांच्या खताच्या प्रमाणिकरण बाबतच्या न्यायालयीन लढ्याचा परामर्ष घेतला.
त्यांनी सांगितले की व्यापाऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पण जमा – खर्चाच्या नोंदी ठेवणे अत्यावशक आहे. त्यांनी परिश्रमाने तयार केलेल्या “कृषी अर्थमेळ” ह्या डायरीचे उपस्थिताना मोफत वाटप केले.
डॉ. दीपक गायकवाड, अर्थ कृषितज्ज्ञ यांनी सांगितले की, पाणी आणि निविष्ठांचा सढळ वापर होऊनही गेली काही वर्षे उसाच्या उत्पादकतेमध्ये स्थिरता आली नाही. त्यामुळे आता ऊस शेती तंत्र, प्रशिक्षण, पाणी, माती आरोग्य, वाफसा यासारख्या तांत्रिक पीक व्यवस्थापन कौशल्ये ऊस शेतीत वापरणे ही काळाची गरज आहे. नेमक्या याच मुद्यावर, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जोर देऊन तांत्रिक आधुनिकता (TFP-Total Factor Productivity) याची परिणामकारकता साधूनच कृषी उत्पादकता येत्या काळात वृद्धिंगत करता येईल, त्यासाठी आर्थिक तरतुदी अर्थसंकल्पात केल्या आहेत. डॉ. गायकवाड यांनी असे सुचवले की या फोरममध्ये कृषी क्षेत्रातील अभ्यासक, उस शेतकरी, साखर कारखानदार, अर्थशास्त्रज्ञ, प्रशासक, इंजिनीअर्स, कृषी क्षेत्रातील अनुभव समृद्ध असे लोक आहेत. त्यांनी एकत्रितपणे काम करून देशापुढे ऊस उत्पादकतावृद्धी साठी एक व्यवहार्य, शाश्वत व परिणामकारक मॉडेल मांडले पाहिजे.
‘कान बायोसिस रिसर्च ॲण्ड एज्युकेशन फाउंडेशनचे’ व्हाईस प्रेसिडेंट श्री. प्रशांत कुलकर्णी व श्री. अमेय जोशी यांनी जमिनीचे आरोग्य या विषयी माहिती देतांना समक्ष शेतात प्रयोग करून शेतक-यांना प्रात्यक्षिके दाखवित असल्याचे सांगितले.
या वेळी एकरी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी श्री. खंडू भुजबळ व नितीन वरखडे यांनी त्यांची यशोगाथा सांगितली. श्री. अजित चौगुले (कार्यकारी संचालक, विस्मा) यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.
तसेच ‘शुगरटुडे’ या साखर उद्योगाला समर्पित मासिकाचे मुख्य संपादक श्री. नंदकुमार सुतार, श्री. महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व माजी कार्यकारी संचालक (यशवंत सह. साखर कारखाना, थेऊर) श्री. साहेबराव खामकर यांनी आभार प्रदर्शन केले.