कर्नाटकमध्ये ४६८२ कोटींचे ऊस बिल थकीत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१५ दिवसांत पैसे देण्याच्या नियमालाही हरताळ

अंकली : कर्नाटक राज्यात ऊस गाळप हंगाम वेगाने सुरू असतानाच, कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या बिलांना होणाऱ्या विलंबामुळे संताप व्यक्त होत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, चालू हंगामातील तब्बल ४६८२ कोटी रुपयांची देणी अद्याप कारखान्यांकडे थकीत असून, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. काही कारखान्यांनी ८०% बिले देऊन दिलासा दिला असला, तरी अनेक मोठे कारखाने अद्याप सुस्त आहेत. थकीत रक्कम व्याजासह त्वरित खात्यावर जमा करावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.


आकडेवारीवर एक नजर
यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३९० लाख टन उसाचे गाळप झाले असून ३१.७२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. १५ जानेवारीपर्यंतची अधिकृत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
एकूण देय रक्कम: १५,६०९ कोटी रुपये
प्रत्यक्ष वाटप: १०,९३५ कोटी रुपये
शिल्लक थकबाकी: ४,६८२ कोटी रुपये


जिल्ह्यानुसार थकबाकीचा तपशील (कोटी रुपयांत)

जिल्हा   (थकीत रक्कम)
बेळगाव – (१७६९ कोटी)
बागलकोट – (१३८२ कोटी)
विजापूर –  (६०८ कोटी)
गुलबर्गा –  (३८६ कोटी)
बिदर-  (२४९ कोटी)

नियमांचे उल्लंघन आणि लांबलेला हंगाम
कायद्यानुसार, कारखान्याला ऊस पुरवठा केल्यानंतर १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी १५ डिसेंबरनंतरची बिले अद्याप दिलेली नाहीत. सुरुवातीला ऊस दरावरून झालेल्या आंदोलनांमुळे हंगाम उशिराने सुरू झाला, परिणामी आता हा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंत चालण्याची चिन्हे आहेत.


आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »