मनसेच्या वतीने रेणापूर तालुक्यात ऊस परिषद

लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी ऊस परिषदेचे आयोजिन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मनेसेचे नेते दिलीपबापू धोत्रे व ऊसतज्ज्ञ पांडुरंग आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेला मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, नांदेड जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण चव्हाण, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कदम, जिल्हा सचिव संतोष दाणे, रेणापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मराठवाड्यातील कारखान्यांनी साडेतीन हजारांचा भाव द्यावा ः राजू शेट्टी
यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना किमान साडेतीन हजार प्रतिटन उसाला भाव दिला पाहिजे. एवढा भाव देत नसतील तर ऊस गाळपाला देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. साखर कारखानदार शेतकऱ्यांना काटेमारी व रिकव्हरी चोरीच्या माध्यमातून लुटत आहेत. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली जात नाही. तोडणी वाहतूकदार पैशाची मागणी करत आहेत. या सर्व फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांनी एकजूट होऊन लढले पाहिजे.
मनेसेचे नेते दिलीपबापू धोत्रे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे एकजूट करून एफआरपी पदरात पाडून घेतली पाहिजे. ऊसतज्ज्ञ पांडुरंग आव्हाड म्हणाले की, एक एकरमध्ये शंभर टन ऊस उत्पादनाचा कानमंत्र शेतकऱ्यांना दिला. परिषदेचे आयोजक मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी पन्नगेश्वर कारखान्याने शेतकऱ्यांचे भाग व अन्य देणी न दिल्यास कारखाना चालू न देण्याचा इशारा दिला. या परिषदेदरम्यान अनेक मान्यवरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती आपली मनोगते व्यक्त केली.






