दीडशेवर गाळप परवान्यांचे वितरण

पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाने वेग घेतला असून, साखर आयुक्तालयाने आजवर दीडशेवर गाळप परवान्याचे वितरण केले आहे.
विशेष म्हणजे विकास शाखेने १५ नोव्हेंबर रोजी शासकीय सुटी असतानाही, कामकाज करत ऊस गाळपासाठीच्या दाखल प्रस्तावांचा निपटारा केला. नव्याने ४० साखर कारखान्यांना ऑनलाइनद्वारे ऊस गाळप परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे परवाने दिलेल्या साखर कारखान्यांची संख्या आता १४२ झाल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ऊसतोडणी कामगारांना आपापल्या गावी उपस्थित राहता यावे म्हणून गाळप हंगामाची तारीख वाढविण्याची मागणी सुरू झाली होती.
त्यावर राज्य सरकारकडून निवडणूक आयोगास पत्रव्यवहार झाला. परंतु, निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे पूर्वघोषित केल्यानुसार निवडणूक आयोगाच्या अधीन राहून १५ नोव्हेंबरपासून ऊस गाळप सुरू करण्यासाठीचे १११ परवाने गुरुवारी देण्यात आले. त्यात नव्याने ४० कारखान्यांची भर पडल्याने ऊस गाळप जोमाने सुरू होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.