१७० कारखान्यांचे गाळप सुरू, ४३ कारखान्यांचे परवाने लटकले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाची सुरुवात १ नोव्हेंबर पासून झाली असली, तरी ४३ साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाने मिळण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, मात्र १७० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू आहे. गत हंगामापेक्षा सुमारे २० ते २२ टक्के अधिक ऊस गाळप यावेळी होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळाली.

यंदा  २१३ साखर कारखान्यांनी गळीतासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातील ४३ कारखान्यांचे अर्ज काही शासकीय अटींच्या पूर्ततेसाठी बाजूला ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने एफआरपी थकबाकी, सरकारी देणी आदींचा समावेश आहे.

दरम्यान, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, या साखर कारखान्यांशी चर्चा सुरू आहे आणि काही दिवसांतच त्यांच्या परवान्यांच्या प्रश्नदेखील निकाली लागेल आणि सर्वांना परवाने मिळू शकतील. यंदाचा गाळप हंगाम खूप समाधानकारक राहण्याची आम्हाला आशा आहे.

एफआरपी प्रलंबित असणाऱ्या चाळीस कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे थोडी बहुत थकलेली एफआरपी रक्कमही लवकरच अदा केली जाईल. तसेच २८ कारखान्यांविरुद्ध आरआरसी कारवाई सुरू केली असता, बहुतांश कारखान्यांनी थकबाकी जमा केली, सुमारे ५४६ कोटींपैकी आता सुमारे २८ कोटी रूपये बाकी शिल्लक आहे, अशी माहितीही डॉ. कोलते यांनी दिली.

(टीप : ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत साखर कारखान्यांच्या परवान्यांमध्ये वाढ होणे स्वाभाविक आहे. कारण साखर आयुक्तालयात सातत्याने यावर काम सुरू आहे.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »