अनेक अडचणींवर मात करत यंदाचा गळीत हंगाम समाधानकारक
महाराष्ट्रात 169 साखर कारखान्यांचे गाळप आटोपले
पुणे : केंद्र सरकारचा इथेनॉलबाबतचा उशिराचा निर्णय, साखरेचे निरूत्साही करणारे दर, कमी पाऊस, कमी ऊस क्षेत्र, राज्य बँकेने घटवलेली पत… अशा प्रतिकूल परिस्थितीतही यंदा ऊस गळीत हंगाम समाधानकारक राहिला आहे. त्याबद्दल ‘शुगरटुडे’चा महाराष्ट्रातील साखर उद्योगाला ‘सॅल्यूट’ आहे.
महाराष्ट्रात 2023-24 चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून राज्यातील साखरेचे उत्पादन 108 लाख टनांच्या पुढे गेले आहे. तसेच राज्यात साखरेचे उत्पादनही गेल्या हंगामापेक्षा जास्त झाले आहे. यंदा एफआरपी अदा करण्याच्या आघाडीवरही समाधानकारक स्थिती आहे. काही माध्यमे विनाकारण दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत आहेत.
महाराष्ट्रात 169 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे, तर गेल्या हंगामात 04 एप्रिलपर्यंत 201 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. यंदा आनंदाची बातमी अशी की, या हंगामात साखरेच्या रिकव्हरीतही चांगली वाढ दिसून येत आहे.
2023-24 च्या हंगामात राज्यात 04 एप्रिल 2024 पर्यंत साखरेची रिकव्हरी 10.24 टक्के आहे, तर गेल्या हंगामात या वेळेपर्यंत साखरेची रिकव्हरी 9.98 टक्के होती.
कोल्हापूर विभागात 37 साखर कारखाने, सोलापूर विभागात 44 साखर कारखाने, पुणे विभागात 25 साखर कारखाने, अहमदनगर विभागात 18 साखर कारखाने, छत्रपती संभाजीनगर विभागात 18 साखर कारखाने, नांदेड विभागात 23 साखर कारखाने, नागपूर विभागात 1 साखर कारखाना आणि अमरावती विभागात 3 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले असून महाराष्ट्रात एकूण 169 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे.
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार या हंगामात एकूण 207 साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. त्यामध्ये 103 सहकारी आणि 104 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. 04 एप्रिल 2024 पर्यंत 1056.42 लाख टन उसाचे गाळप झाले असून राज्यात 1081.9 लाख क्विंटल (108.19 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे.
गत हंगामात 211 साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता आणि 1053.71 लाख टन उसाचे गाळप करून 1051.52 लाख क्विंटल (105.15 लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते.
-(माध्यमांना आवाहन : सर्व प्रमुख माध्यमांमध्ये साखर उद्योगाच्या बातम्या दिल्या जाताना अनेक चुका होतात. उदा. अमूक एवढे साखर कारखाने बंद.
वास्तविक गाळप हंगाम बंद, गाळप हंगाम आटोपला असा उल्लेख योग्य आहे. ‘बंद’ हा उल्लेख चुकीचा आहे. कारखाना बंद होत नसतो, गाळप थांबलेले असते. ‘बंद’ला खूप वेगळा अर्थ आहे. त्यामुळे बातम्या देताना सर्वांनी काळजी घ्यावी, ही विनंती.)