‘श्री विघ्नहर’ वगळता राज्याचा गळीत हंगाम आटोपला

पुणे : जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना वगळता, महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम संपला आहे. साखर आयुक्तालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात यावेळी ८० लाख ७६ हजार मे. टन साखर उत्पादित झाली आहे.
राज्यात २०० साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला, त्यात ९९ सहकारी आणि १०१ खासगी कारखान्यांचा समावेश हात. १६ एप्रिल रोजी साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, १९९ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे आणि एकच कारखाना सुरू आहे. गत हंगामात आतापर्यंत १९७ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला होता, मात्र दहा कारखाने सुरू होते.
सर्व कारखान्यांनी मिळून या हंगामात आतापर्यंत ८५३ लाख मे. टन (गत हंगामात १०७४ लाख मे. टन) गाळप करून, सरासरी ९.४८ टक्के उताऱ्याने ८०.७६ लाख मे. टन साखर उत्पादित केली आहे. गत हंगामात ११० लाख मे. टन साखर उत्पादन झाले होते, तर सरासरी साखर उतारा १०.२५ होता. म्हणजे या हंगामात उतारा आणि उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते.
नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागाने ११.०८ उताऱ्यासह राज्यात अव्वलस्थान कायम ठेवले आहे. नागपूर विभाग शेवटच्या क्रमाकांवर (५.१२) आहे. साखर उताऱ्यात ९.६७ सह नांदेड विभाग दुसऱ्या आणि ९.६५ सह पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गाळपामध्ये २०७ लाख टनांसह पुणे विभाग प्रथम स्थानी आहे, तर २०३ लाख टनांसह कोल्हापूर विभाग द्वितीय आहे. साखर उत्पादनात मात्र कोल्हापूर विभाग २२.५ लाख मे. टनांसह नंबर वन वर आहे. त्याखालोखाल पुणे विभागाने २० लाख टन साखर उत्पादित केली आहे.
राज्यात सर्वाधिक ४५ साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर विभागाने १३२ लाख टन ऊस गाळप करून, १०.७५ लाख टन साखर उत्पादन केले आहे.