गाळप हंगामाला १ नोव्हेंबरचा मुहूर्त

मुंबई : महाराष्ट्रातील ऊस गळीत २०२५-२६ येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कारखाने आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक कारखान्यांचे बॉयलर आधीच पेटले आहेत. आजपर्यंत किती कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले आहेत, याची माहिती साखर आयुक्तालयातून मिळू शकली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली. त्यात नुकताच झालेला पाऊस, एकूण ऊस उपलब्धता, शेजारील राज्यातील हंगाम आदींचा आढावा घेण्यात आला आणि महाराष्ट्रातील गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार सचिव, प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे आणि अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
गूळ पावडर कारखाने आधीच सुरू झाले आहेत, यावर बैठकीत चर्चा झाली. कृषी विभागाने राज्यातील ऊस उपलब्धतेची आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती सादर केली.






