गळीत हंगाम नव्हे, तर इक्षुदंड महोत्सव!

–नंदकुमार सुतार, मुख्य संपादक (शुगरटुडे)
लांबलेला पावसाळा, लहरी पावसाने मराठवाड्यात घातलेला धुमाकूळ, सरकारची धोरणात्मक धरसोड, सुमारे २१६ कारखान्यांनी गाळपासाठी केलेले अर्ज, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने साखर कारखान्यांवर टाकलेला भार, ऊस तोड मजुरांचा तुटवडा, गुन्हाळघरांचा वाढता जोर….. अशा पार्श्वभूमीवर यंदाचा म्हणजे २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरू झाला आहे. बॉयलर एव्हाना पेटलेले आहेतच, गव्हाणीत मोळ्या टाकून शुभारंभ करायची घाई सुरू झाली आहे. कारखान्यांमध्ये लगबग दिसत आहे..…
हे सर्व लक्षात घेता आणि कारखानदार तसेच त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहता, हा केवळ गाळप हंगाम वाटत नाही, तर त्यापलीकडचा अनुभव आहे. पूर्वी शेतात खळी व्हायची आणि घरात धान्यांच्या राशी येऊन पडायच्या, यामागे केवळ अर्थाजनच नव्हे, तर शेतकऱ्यांची अवर्णनीय पवित्र भावना असायची! सणांच्या काळात असते, त्याप्रमाणे। अगदी तशीच भावना आपल्या देशात, विशेष करून महाराष्ट्रातील गाळप हंगामाच्या काळात पाहायला मिळते. कोणत्याही उद्योग क्षेत्रामध्ये हे दृश्य पाहायला मिळत नाही. संपूर्ण देखभाल, मग रोलर पूजन, बॉयलर प्रदीपन, गाळप शुभारंभ… अशा साऱ्या प्रक्रिया एखाद्या मोठ्या सणातील विधीप्रमाणे केल्यात जातात.
विशेष म्हणजे हा हंगाम दिवाळीच्या कालावधीतच येतो. म्हणून आम्हाला वाटते की हा गळीत हंगाम नव्हे, तर तो आहे ‘इक्षुदंड महोत्सव’। इक्षुदंड हे उसाचे संस्कृतमधील नाव, हे आपणास ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ या श्री. शेखर गायकवाड आणि श्री. मंगेश तिटकारे लिखित महाग्रंथामुळे एव्हाना समजलेलेच आहे.

कृषी माल प्रक्रिया उद्योग खूप मोठा आहे. जोडीला दुग्धप्रक्रिया उद्योगदेखील प्रचंड विस्तारलेला आहे; पण ऊस प्रक्रिया उद्योगाप्रमाणे एकत्रित हंगाम इतरत्र दिसून येत नाही. म्हणूनच तर याला ऊस महोत्सव किंवा इक्षुदंड महोत्सव म्हणायला काय हरकत आहे?
असा महोत्सव अमरिकेत खरंच साजरा होतो, असं सांगितलं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, लुईझियाना प्रांतामध्ये दरवर्षी सप्टेंबरमध्ये ‘शुगरकेन फेस्टिव्हल’ गाळप हंगाम सुरू होताना भव्य प्रमाणात साजरा होतो. ‘कॅश क्रॉप’ असलेल्या उसाबद्दल आदर व्यक्त करणे, तो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणे आणि साखर उद्योगाला समर्थन हा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे.
याअंतर्गत ट्रॅक्टर परेड, पाच किमी दौड, छायाचित्रे आणि फुलांचे प्रदर्शन, सांगितिक शो इ. भरगच्च कार्यक्रम होतात. आपणही पुढील वर्षापासून या उत्सवापासून प्रेरणा घेऊ या. सर्वांना ‘इक्षुदंड महोत्सवा’च्या खूप खूप शुभेच्छा!

(हा शुगरटुडेच्या दिवाळी अंकातील संपादकीय लेख आहे. तो सविस्तर वाचण्यासाठी शुगरटुडे दिवाळी विशेषांक आजच घ्या. व्हॉट्सअॅप संदेशासाठी क्रमांक ८९९९७७६७२१)





