करवीरमध्ये उसाला आग : २०० शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर

करवीर : गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास वडकशिवाले येथील शिवारात आग लागल्याची दुर्घटना घडली. बाचणी रस्त्यावरील स्मशानभूमीपासून सुरू झालेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी उसाचा पट्टा तोडून आग थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ११० एकर ऊस जळाला होता.
बिद्री कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी जळीत ऊस तातडीने गाळपासाठी नेण्यासाठी निगवे, बाचणी आणि वडकशिवाले येथील वाहने घटनास्थळी रवाना करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, जळीत उसासाठी कारखान्याकडून टनाला ३०० ते ४०० रुपये कपात केली जाते, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
याबाबतची माहिती अशी, बाचणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या स्मशानभूमीपासून’ पुढे उसाला आगीने वाऱ्याच्या वेगामुळे रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट आकाशाला भिडले होते. शेतकरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उसाचा पट्टा तोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बिद्री व कागल येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी सर्व आग आटोक्यात आणली. ग्रामपंचायत प्रशासन, तलाठी, पोलिस पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली.
२०० शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
या आगीत ११० एकरांतील सुमारे ३००० टन ऊस जळून खाक झाला. यात २०० शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग शॉर्टसर्किटने लागली की, अन्य कशाने याचे कारण समजू शकले नाही.






