योग्य हमीभावासह उसाची एफआरपी वाढवावी
बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी
सातारा : आगामी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उसाचे एकरी उत्पादन घटू लागले आहे. उसाच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामानाने उसाला योग्य हमीभाव मिळत त्यामुळे योग्य हमीभाव व उसाची एफआरपी वाढवावी, तचेच राज्य सरकारकडून साखर कारखान्यांना १५ नोव्हेंबर पूर्वी ऊस गाळपास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती केली जात आहे. याचा हिशेब दाखवला जात नाही. पूर्वीप्रमाणे शेतकरी ऊस पिकासाठी पैसे खर्च करत नाहीत. त्यामुळे एकरी ६० टन असणारे उत्पादन आता एकरी ४० टन सुद्धा निघत नाही. साखर कारखानदार फायदा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी कारखाने हंगामापूर्वी सुरू करत आहेत. त्यावेळी उसाची पूर्ण वाढ झालेली नसते. परंतु कारखाने स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा कोवळा ऊस तोडून नेत आहेत. थंडीमध्ये रिकव्हरी कमी लागते. उसाची रिकव्हरी कमी होण्यासाठी इथेनॉल निर्मितीसाठी रसाचा थेट वापर केल्यामुळे आणि साखर कारखाने हंगामापूर्वी थंडीमध्ये सुरू केल्यामुळे रिकव्हरीवर परिणाम होत आहे. याचा परिणाम ऊस बिलावर होत आहे. त्यामुळे या वर्षीच्या गळीत हंगामात सरकारकडून साखर कारखान्यांना १५ नोव्हेंबर पूर्वी ऊस गाळपास परवानगी देण्यात येऊ नये, तसेच योग्य हमीभाव व उसाची एफआरपी वाढवून द्यावी, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.






