२.८९ लाख ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे नोंदणी
पुणे : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे आतापर्यंत सुमारे २.८९ लाख कामगारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. अंदाजे दहा लाख ऊसतोडणी कामगार आहेत. दरम्यान, राज्यात या कामगारांच्या मुलांसाठी १८ वसतिगृहे सुरू झाली आहेत.
‘आपले सरकार सेवा केंद्रा’वरही कामगार नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली तसेच कामगारांबाबतच्या विम्याचा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे पाठविला असून, लवकरच त्यास मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.
महामंडळाकडे आत्तापर्यंत १३० कोटी रुपये जमा झालेले आहेत. महामंडळाच्या वतीने कामगारांच्या मुलांसाठी राज्यात १८ वसतिगृहे सुरू करण्यात आली असून, त्या ठिकाणी ९८९ मुले वास्तव्यास आहेत.
साखर आयुक्तालयातील बैठकी दरम्यान वरील माहिती मिळाली. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, साखर संचालक (प्रशासन) राजेश सुरवसे, साखर सहसंचालक (उपपदार्थ) अविनाश देशमुख, सहायक संचालक (विकास) सचिन बऱ्हाटे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक (विस्मा) अजित चौगुले, राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या अधिकारी मीनल वारे, सहायक कामगार आयुक्तलयातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री समितीच्या बैठकीतील यापूर्वीच्या निर्णयानुसार साखर कारखान्यांनी प्रतिटनास दहा रुपयांप्रमाणे होणारी रक्कम महामंडळास द्यावयाची आहे. त्यामध्ये आतापर्यंत २०२१-२२ मधील ४ रुपयांप्रमाणे रक्कम जमा झालेली आहे.
तसेच, वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ मधीलही संपूर्ण रक्कम अद्याप प्राप्त झालेली नसल्याची माहिती बैठकीत मांडण्यात आली. त्यावर साखर आयुक्तालयाकडून लवकरच परिपत्रक काढून कारखान्यांना महामंडळाची देय रक्कम भरण्याबाबत कळविण्याचे ठरले आहे. सद्यः स्थितीत साखर कारखान्यांनी महामंडळाकडे सुमारे ७८ कोटी रुपये जमा केलेले असून, शासनाने ५२ कोटी रुपये दिल्याची माहिती बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी दिली.