कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले; तीन वाहने पेटवली

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जयसिंगपूर : राज्यात आगामी गाळप हंगाम हा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अनेक साखर कारखान्ऱ्यांनी अद्याप ऊस दराचा तोडगा काढला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करीत आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलक संतप्त होताना दिसत आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे ऊस वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना घडली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे आंदोलनाचा आणखी भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखणे, कारखान्ऱ्यासमोर आंदोलन करणे, वाहने पेटवून देणे अशा स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, संघटनांनी केलेल्या दराच्या मागणीवर कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे. त्यामुळे गाळप हंगामापूर्वीच ऊस दराचा प्रश्न मार्गी लावून हंगाम सुरळीत सुरू व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे.

जिल्हा प्रशासनाने मध्यस्थीची भूमिका न घेतल्याने आंदोलन आक्रमक

दरम्यान, उसाच्या वाहनांना आगीचा भडका उडाल्यानंतर वाहने पेटवून दिल्याचे लक्षात आले. पोलिसांना तातडीने घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत अनोळखी आंदोलक घटनास्थळावरून पसार झाले होते. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अद्याप ऊस दराच्या प्रश्नात मध्यस्थीची भूमिका घेतली नसल्याने आंदोलक आणि कारखानदारांमध्ये चर्चेला सुरुवात झाली नाही. त्यामुळेच आंदोलन आक्रमक झाले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »