शिराळा तालुक्यात उसाच्या ट्रॅक्टरला अपघात; चालकाचा मृत्यू

शिराळा : तालुक्यातील कोकरूड येथील आटूगडेवाडीत उसाच्या ट्रॅक्टरवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही अपघात वाकुर्ड बुद्रुक-शेडगेवाडी मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. श्रीपाद शिवाजी ठाकरे (वय ४०, रा. विटनेर, ता. जि. जळगाव, सध्या रा. वाटेगाव, ता. वाळवा) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ७) मध्यरात्री वाकुर्ड बुद्रुक येथून ऊस भरलेला ट्रॅक्टर डालमिया शुगर कारखान्याकडे निघाला होता. ट्रॅक्टर आटूगडेवाडी येथे पोहोचला असता त्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या बाबा कात्रे यांच्या शौचालयावर जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालक श्रीपाद ठाकरे हे ट्रॉलीखाली दबले जाऊन जागीच ठार झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कृष्णा धनराज भील (रा. विटनेर, ता. जि. जळगाव) यांनी याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास कोकरूड पोलिस करत आहेत.






