ऊस वाहतूकदार फसवणूकप्रकरणी मुकादमावर गुन्हा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : कराड तालुक्यातील एका ऊस वाहतुकदाराची तब्बल दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यातील एका मुकादमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक सुदाम ढगे (रा. आंबड रोड, नूतन वसाहत, शंकरनगर, जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे.  याप्रकरणी संदीप सूर्यकांत थोरात (कोर्टी, ता. कराड) या ऊस वाहतुकदाराने कराड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, कोर्टी येथील संदीप थोरात अनेक वर्षांपासून सहकारी साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतुकीचे काम करतात. २०२२-२३ च्या हंगामात मुकादम अशोक ढगे थोरात यांना भेटला. ढगे याने विश्वास संपादन करत पुढील हंगामासाठी ९ जोड्या म्हणजे १८ मजूर पुरविण्याचे आश्वासन थोरात यांना दिले होते. त्यानुसार त्याने थोरात यांच्याकडून दीड लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर जून २०२३ मध्ये कराड येथे नोटरी करार करत आणखी २ लाख रुपये घेतले. त्याचबरोबर थोरात यांनी त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण ७ लाख रुपये ढगेच्या बँक खात्यावर पाठवले. एकूण रक्कम १० लाखांपर्यंत पोहोचली. मात्र, करारानुसार दिलेले काम न करता अशोक ढगे याने पळ काढला होता.

 दरम्यान, संदीप थोरात व त्यांच्या सहकार्यांनी जालना येथे जाऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही मजूर आणतो, असे सांगत ढगेने वेळ मारून नेली. मात्र, १८ डिसेंबर रोजी रातोरात तो त्याच्या पत्नी व इतर मजुरांसह निघून गेला. अशोक ढगे याचा फोन बंद असून कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच थोरात यांनी कराड शहर पोलिसांत याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »