ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक
कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अनामत रक्कम घेऊन ऊसतोडीसाठी टोळ्या न पाठविता मुकादमांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने, फसवणूक झालेल्यांनी तक्रारी दाखल करण्यास पुढे येण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केल्यानंतर, येथील पोलिसात ६५ जणांनी फिर्याद दिली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखलची कार्यवाही सुरु होती. यामध्ये ४५ ते ५० कोटींच्या फसवणुकीचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
शिरोळ, गडहिंग्लज, गारगोटी, इचलकरंजी आदी ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली. ही संख्या वाढतच आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दोन दिवसांपूर्वी अशा फसवणुकीच्या तक्रारी आपापल्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी नऊपासूनच वाहतूकदार पोलिस ठाण्याकडे येत होते.
सायंकाळी सहापर्यंत ६५ वाहतूकदारांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस फिर्याद दाखल करुन घेण्याची कार्यवाही करीत होते.
पूर्वी साखर कारखानेच बीडसह इतर भागातील ऊस तोड टोळ्यांशी करार करायचे. मात्र यामध्ये मुकादमांकडून फसवणुकीचे प्रकार वाढल्याने कारखान्यांनी अंग काढून घेत वाहतूकदारांवरच जबाबदारी दिली. करारसुद्धा वाहतूकदारांचेच केले जातात.
अनेक वर्षांपासून या भागातील ऊस वाहतूकदार बीड, परभणी, यवतमाळ, सोलापूर, नगर आदी भागातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या मुकादमांना अॅडव्हान्स रक्कम देवून बुकींग करतात. तसे करारही होतात. मात्र बहुतांश मुकादमांकडून टोळ्यांचा पुरवठाच होत नाही. अशा फसवणुकीमुळे भागातील वाहतूकदार मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत.