मिरची तोडल्याच्या कारणावरून ऊसतोड कामगारांना बेदम मारहाण

श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथे ऊसतोडीसाठी गेलेल्या नांदगावच्या कुटुंबाला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली. मिरची तोडल्याचा ठपका ठेवत महिला आणि बालकांसह १८ जणांना जखमी करण्यात आले असून, यात अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नांदगाव तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आमदार सुहास कांदे यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. पीडितांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन करावे लागले असून, आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू झाली आहे.






