भारतीय पंचायत राज दिन

आज गुरुवार, एप्रिल २४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ४, शके १९४७
सूर्योदय : ०६:१५ सूर्यास्त : १८:५९
चंद्रोदय : ०४:१०, एप्रिल २५ चंद्रास्त : १५:३३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह :चैत्र
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : वरुथिनी एकादशी – १४:३२ पर्यंत
नक्षत्र : शतभिषज – १०:४९ पर्यंत
योग : ब्रह्म – १५:५६ पर्यंत
करण : बालव – १४:३२ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०१:१२, एप्रिल २५ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : कुंभ – ०३:२६, एप्रिल २५ पर्यंत
राहुकाल : १४:१२ ते १५:४८
गुलिक काल : ०९:२६ ते ११:०१
यमगण्ड : ०६:१५ ते ०७:५०
अभिजितमुहूर्त : १२:११ ते १३:०२
दुर्मुहूर्त : १०:२९ ते ११:२०
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२६
अमृत काल : ०१:३२, एप्रिल २५ ते ०३:००, एप्रिल २५
वर्ज्य : १६:४२ ते १८:११
श्री वल्लभाचार्य -त्यांच्या जन्मकथे नुसार त्यांना अग्नीचा अवतार मानले गेले आणि मोठे झाल्यावर ते बाल वल्लभाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. श्री वल्लभ वेद आणि उपनिषदे वाचून मोठे झाले.
रुद्र संप्रदायातील विल्वमंगलाचार्यांनी त्यांना अष्टदशाक्षर गोपाल मंत्रात दीक्षा दिली आणि स्वामी नारायणेंद्रतीर्थ येथून त्रिदंड संन्यासाची दीक्षा घेतली.
वल्लभाचार्यांचे शिष्य: असे मानले जाते की वल्लभाचार्यांचे 84 (चौराऐंशी) शिष्य होते, ज्यात मुख्य म्हणजे सूरदास, कृष्णदास, कुंभनदास आणि परमानंद दास.
वल्लभाचार्यांचे तत्त्वज्ञान: वल्लभाचार्यांच्या मते ब्रह्म, विश्व आणि आत्मा ही तीनच तत्त्वे आहेत. म्हणजे देव, जग आणि आत्मा. वरील तिन्ही घटकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी जगाचे आणि प्राण्यांचे प्रकार सांगितले आणि त्यांचे परस्पर संबंध उलगडले.
त्यांच्या मते ब्रह्म हे एकमेव सत्य आहे जे सर्वव्यापी आणि अंतरंग आहे. कृष्णभक्त असल्याने त्यांनी कृष्णाचा ब्रह्म असा महिमा सांगितला आहे. वल्लभाचार्यांच्या अद्वैतवादात मायेचा संबंध नाकारून, ब्रह्म हे कारण आणि जिवंत जग हे त्याचे कार्य असे वर्णन करून तिन्ही शुद्ध तत्वांची समानता प्रतिपादन केली आहे. यामुळेच त्यांच्या मताला शुद्ध द्वैतवाद म्हणतात.
प्रसिद्ध ग्रंथ: ब्रह्मसूत्रावरील अनुभाष्याला ब्रह्मसूत्र भाष्य किंवा उत्तरामीमांसा, श्रीमद भागवतावरील सुबोधिनी टिका आणि तत्वदीप निबंध असे म्हणतात. याशिवाय त्यांची अनेक पुस्तके आहेत. सगुण आणि निर्गुण भक्तीधाराच्या युगात वल्लभाचार्यांनी स्वतःचे तत्वज्ञान निर्माण केले होते पण त्याचे मूळ स्त्रोत फक्त वेदांतातच आहेत.
रुद्र संप्रदायाचे प्रवर्तक विष्णुस्वामी यांच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करून त्यांचा विकास करून त्यांनी आपली शुद्धवैत मात किंवा पुष्टीमार्ग स्थापन केला.
१५३० मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी काशीतील हनुमानघाट येथे गंगेत प्रवेश करून जलसमाधी घेतली.
आज श्री वल्लभाचार्य जयंती आहे.
आज भारतीय पंचायत राज दिन आहे.
उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर – किर्लोस्कर ब्रँडला कोणी ओळखत नाही असा व्यक्ती आज महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. इ.स. 1888 साली लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लि. नावाची कंपनी उभारली आणि या कंपनीला आज यशाच्या शिखरावर त्यांच्या मुलाने – शंतनुराव किर्लोस्कर यांनी पोहचवले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते…
शंतनुरावांनी भारतात बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेमध्ये मॅसेच्युसेट्स येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचे अधिक शिक्षण घेतले. मोठ्या पगाराच्या परदेशी नोकरीच्या जाळ्यात न अडकता आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंतनुराव आपल्या मायदेशी परतले…
अमेरिकेतून शिक्षण घेऊन आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी कामगारांसमवेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. घराची आणि व्यवसायाची जबाबदारी शंतनुरावांनी आपल्या खांद्यावर कायम पेलली. मराठी माणूस आणि उद्योग यातील विसंवादाच्या सार्या शक्यता मोडून काढत शंतनुरावांनी किर्लोस्कर उद्योगांच्या अनेक शाखा देशात ठिकठिकाणी सुरु केल्या…
त्यांनी १९४६ मध्ये पुणे येथे खडकी भागामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन्स व कमिन्स हा इंजीन निर्मितीविषयक कारखाना परदेशी सहकार्याने स्थापन केला. हडपसर येथे किर्लोस्कर ब्रदर्स ही कंपनी स्थापन केली. तसेच पुणे इंडस्ट्रियल हॉटेल (ब्ल्यू डायमंड) सुरू केले. याच वेळी त्यांनी पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज च्या कामामध्ये भाग घेऊन उद्योजकांचे प्रश्न भारत सरकारपुढे मांडले. स्वच्छ व सुंदर पुणे ही योजना त्यांनी पुण्यातील शाळांमध्ये रुजविली. पुण्यातील अनेक संस्थांना अर्थसहाय्य केले.
किर्लोस्कर समूहामधील विविध कंपन्यांची नावे पाहिली तरी त्यांच्या यशाचा आलेख सहजच डोळ्यांसमोर उभा राहतो. नांगर तयार करणारा हा उद्योग समूह पुढे यांत्रिक हत्यारे तयार करणारा भारतातला पहिला उद्योग बनला. या उद्योग समूहाने विविध प्रकारची इंजिने यंत्रे तयार करत संगणक तयार करण्यासाठी थेट अमेरिकन कंपनीशी करार केला.
शंतनुरावांनी केवळ यंत्रांचे उत्पादनच केले असे नाही तर त्यांनी उत्पादन वाढवणार्या यांत्रिक आधुनिक शेतीचा प्रसार देखील केला. अनेक प्रदर्शनांतून कार्यशाळांतून छोट्या-मोठ्या सभा-संमेलनांतून त्यांनी शेतकर्यांचे प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कोट्यावधी रुपयांचे परदेशी चलन भारतात आणणार्या पहिल्या काही उद्योजकांपैकी एक म्हणजे शंतनुराव होत. जर्मनी अमेरिका आफ्रिका व युरोप खंडातील काही देश-आदी देशांशी औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्यात किर्लोस्करांचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या कामगिरीनिमित्त त्यांना पद्मभूषण (१९६५) सर वॉस्टर पकी प्राइझ (१९६८) कर्मवीरोत्तम पुरस्कार (१९७२) वाणिज्यरत्न (१९७६) सन्मान्य डी. लिट. पुणे विद्यापीठ(१९८८) पुण्यभूषण (१९९१) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केले गेले.
शंतनुराव केवळ आपल्या समूहाचीच भरभराट करू पाहणारे स्वार्थी उद्योजक नव्हते. ते सामाजिक व सांस्कृतिक आस्था असणारे मराठी माणूस होते. औद्योगिक भारताकडे झालेल्या वाटचालीत शंतनुरावांचा व किर्लोस्कर उद्योग समूहाचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे.
१९९४: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०३)
थोर भारतीय चित्रकार जामिनी रॉय. बेलियातोड (जि. बांकुरा, प. बंगाल) येथे एका जमीनदार कुटुंबात जन्म. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी कलकत्त्याच्या ‘गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट अँड क्राफ्ट’ मध्ये कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथील काटेकोर व शिस्तबद्ध अभ्यासक्रमामुळे त्यांना तांत्रिक कौशल्य व पाश्चात्त्य चित्रशैलीवर प्रभुत्व संपादन करता आले. सुमारे दहा वर्षे त्यांनी या प्रभावाखाली चित्रनिर्मिती केली. या शैलीतील चित्रांमुळे त्यांना व्यावसायिक यश व नावलौकिक प्राप्त झाला. तथापि त्यांना या पाश्चात्त्य शैलीतील आविष्कारात आंतरिक समाधान वाटत नव्हते. या आंतरिक संघर्षातून मार्ग काढून त्यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी पाश्चात्त्य तंत्र-शैलीचा अव्हेर केला व प्रामुख्याने व्यक्तिचित्रे रंगविणे सोडून दिले व स्वतःची स्वतंत्र व सुलभ शैली शोधण्यास सुरुवात केली.
त्यामुळे पाश्चात्त्य शैलीत काम करताना मिळणारे प्रोत्साहन व व्यावसायिक यश त्यांना मिळेनासे झाले. मानसिक एकाकीपण व आर्थिक ताणही सोसावा लागला. तरीही स्वतःचे प्रयोग व स्वतंत्र वाटचाल त्यांनी सुरूच ठेवली. १९३०च्या दरम्यान त्यांच्या ह्या स्वतंत्र कलाविष्कारांना मान्यता मिळू लागली. चित्रातील आकारिक मूल्यांचा नव्याने विचार करण्याची त्यांना गरज भासू लागली व त्यातून ते खेड्यापाड्यांतून जिवंत असलेल्या लोककलेकडे वळले.
‘कंथा’ (कशिदायुक्त रजई) व ‘अलिपना’ (रांगोळी प्रकार) यांवरील आकृतिबंधही त्यांच्या चित्रनिर्मितीत प्रेरक ठरले. लोककला व कलाकार यांच्याशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क होता. लोककलेचे निरीक्षण व स्वतंत्र विचारांद्वारे संशोधित आकारांचे साधारणीकरण यांतून हळूहळू त्यांची स्वतःची शैली विकसित झाली. त्यास बंगालमधील तत्कालीन स्वदेशीची चळवळ व हॅवेल आणि गगनेंद्रनाथ टागोर यांचे आपल्या परंपरा जोपासण्याचे आवाहन हेही कारणीभूत झाले. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा कलकत्त्यातील नाट्यचळवळींशी संपर्क आला. त्यांतून वास्तवता व भासमानता यांतील सीमारेषा स्पष्ट झाल्या व ते चित्रकार म्हणून उपकारक ठरले. कालांतराने त्यांचे विचार आणि अभिव्यक्ती याचे महत्त्व भारतीय कलाजगताला पटले.
रूढ प्रस्थापित पाश्चात्त्य शैलीचा त्याग करून त्यांनी लोककलेचा केलेला आविष्कार हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत कलाजीवनालाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय कलाजीवनालाच नवे वळण देणारा ठरला. म्हणूनच भारतीय कलेचा प्रारंभीचा आधुनिक कालखंड घडविण्यात ज्यांचा हातभार लागला, त्यांत जामिनी राय यांचे स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान आहे. कलेतील भारतीयत्वाच्या प्रसारासाठी, जास्तीत जास्त घरांतून चित्रे पोहोचावीत म्हणून आपल्या एकाच कलाकृतीच्या अनेक प्रती ते स्वतः रंगवीत असत व त्या अत्यंत अल्प किंमतीला विकत असत. कला व तिच्या शुद्धतेसाठी असलेल्या असीम निष्ठेचेच हे द्योतक आहे.
त्यांच्या चित्रांची प्रदर्शने लंडन (१९४६) व न्यूयॉर्क (१९५३) येथे भरली होती. पद्मभूषण (१९५५), ललित कला अकादमीचे फेलो (१९५६), रवींद्र भारती विद्यापीठाची सन्माननीय डी. लिट्. (१९६७) इ. मानसन्मान त्यांना लाभले. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले. त्यांची चित्रे ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न म्यूझियम’ व अनेक खाजगी संग्रहांत संग्रहीत केली आहेत.
१९७२: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन. देशाच्या सीमा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मोजक्या भारतीय चित्रकारांमध्ये रॉय यांची गणना होते. ( जन्म: ११ एप्रिल १८८७ )
- घटना :
१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
१७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
१८००: जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.
१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.
१९६८: मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश
१९७०: गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
१९९०: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
२०१३: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.
• मृत्यू :
• १९४२: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर, १९००)
• १९६०: नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.
• )
• १९९९: चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.
• २०११: आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर, १९२६)
• २०१४: भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर , १९६८)
- जन्म :
१८९६: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९८०)
१९०४ : मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि संपादक केशव तथा के. नारायण काळे यांचा जन्म ( मृत्यू : २० फेब्रुवारी १९७४ )
१९१०: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)
१९२९: कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००६)
१९७३: भारत रत्न पुरस्कार सन्मानित भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.