स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, ऑगस्ट १५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २५, शके १९४७
सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १९:०६
चंद्रोदय : २३:२३ चंद्रास्त : ११:५५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – २३:४९ पर्यंत
नक्षत्र: अश्विनी – ०७:३६ पर्यंत
क्षय नक्षत्र :भरणी – ०६ :०६, ऑगस्ट १६ पर्यंत
योग : गण्ड – १०:१७ पर्यंत
करण : विष्टि – १२:५८ पर्यंत
द्वितीय करण : बव – २३:४९ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : मेष
राहुकाल : ११:०७ ते १२:४३
गुलिक काल : ०७:५५ ते ०९:३१
यमगण्ड : १५:५४ ते १७:३०
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:०८
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४४
दुर्मुहूर्त : १३:०८ ते १३:५९
अमृत काल : ०१:३६, ऑगस्ट १६ ते ०३:०६, ऑगस्ट १६
वर्ज्य : १६:३६ ते १८:०६

ओम कृष्णाय विद्यहे बलभद्राय धिम् र्ही।
तन्नो विष्णु प्रचोदयात ।। ‘
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।

भगवान श्रीकृष्ण हे पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ “काळ्या मुखवर्णाचा” आणि “सर्वाना आकर्षित करणारा” असा होतो.

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे .

गेले दिगंबर ईश्वर विभूती। राहिल्या त्या कीर्ति जगामाजी।।१।।
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी। आता ऐसे कोणी होणे नाही ।।२।।

होय ! संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे ‘आता कोणी ऐसे होणे नाही’ हे ज्ञानदेवाविषयी व्यक्त केलेले कृतज्ञताभाव ज्ञानेश्वरांच्या अलौकिकतेचे प्रतीक आहे. सर्वसामान्यांना सामावून घेऊन अध्यात्माचे सोपे ज्ञान हे ज्ञानेश्वरांनी भागवत धर्म अर्थात वारकरी संप्रदायाच्या रूपाने दिले.

श्रीसंत ज्ञानेश्वर व त्यांच्या तिन्ही भावंडांना श्रेष्ठ वर्णात जन्म घेऊनही वर्णाश्रमाचे चटके सोसावे लागले. त्यांनी घेतलेल्या अनुभवांतून जाती व्यवस्थेच्या मुळे हजारो वर्ष अशाच विषमतेचे चटके सोसत असलेल्या बहुजनांच्या दुःखाशी ते एकरूप झाले. आपले जीवनशास्त्रांचे ज्ञान बहुजनांनाही मिळावे म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतील गीतेचे सार तत्कालीन प्राकृत या लोकभाषेतून देण्याचा निर्णय घेतला.

मराठी भाषेतील सर्वात प्राचीन व सर्वोत्तम ग्रंथांतील एक म्हणून गणली जाणाऱ्या ‘ज्ञानेश्वरी’च्या लिखाणाला त्यांनी नेवासा येथे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सुरुवात केली. यावरून त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्ता व प्रतिभेची कल्पना करता येते. ‘अमृतानुभव’ आणि ‘भावार्थ दीपिका’ हे अन्य दोन ग्रंथही त्यांनी लिहिले. शेकडो अभंग तसेच ‘विरहिणी’ (विराणी) हा काव्यरचना प्रकारही त्यांनी मराठी साहित्याला दिला.

आध्यात्माचे शिक्षण हा कुणा एकाचाच अधिकार नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपला आध्यात्मिक विकास करू शकतो हा संदेश त्यांनी त्याकाळातील शोषितांच्या मनात जागृत केला. त्यामुळे आज वारकरी संप्रदायात अठरापगड जातींतल्या संतांचे अभंग व ग्रंथ आज आपल्या समोर आहेत.

ज्या काळात वडिलांची चूक म्हणून ब्राम्हण असलेल्या भावंडांना शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्यात आला, त्या कळात बहुजनांना कनिष्ठ जातींना, शिक्षणाचा कोणता अधिकार असणार? त्यामुळे केवळ ब्राम्हणांना येणारी संकृत ही ज्ञानभाषा ज्ञानेश्वरांनी नाकारली. बहुजन समाजाची भाषा असलेली सोपी प्राकृत भाषा त्यांनी बहुजनांची ज्ञानभाषा म्हणून वापरात आणली.

त्यामुळेच केवळ भक्तीमार्गच नाही तर, वर्षानुवर्ष जातीव्यवस्थेचे दाहक अनुभव घेणाऱ्या बहुजन संतांना आपले अनुभव अभंगाच्या रुपात लिहून ठेवण्याचा मार्ग सापडला. आज आपल्याकडे असलेले वारकरी साहित्य ही केवळ धार्मिकच नाही तर समाजशास्त्राचा मोठा ठेवा आहे. वारकरी संप्रदायाचे प्रणेते म्हणून, बहुजनांच्या प्रकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून बहुजनांना लिहितं करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे कार्याची उंची हिमालयापेक्षाही खूप मोठी आहे.

आज संत ज्ञानेश्वर माऊली जन्म दिन आहे.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
|| हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ||
|| वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो ||
|| हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो ||
||करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो ||
||या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ||
||ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल ||
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करूया.

II भारतमाता की जय II

पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय. पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे.मुळातुन पर्शिया म्हणजे इराणमधूनहा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे पतेती हा पारशी धर्मीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो. धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजरा करतात.दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला नवरोज (नवी सृष्टी) म्हणले जाते. या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि भोजन घेतात.

आज पारशी बांधवांचा पतेती सण आहे – पारशी नूतन वर्ष प्रारंभ.

भारतीय योद्धा संगोली रायन्ना – त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी कित्तूर (कर्नाटक) मधील संगोळी या छोट्या गावात एका कुरुबा (धनगर) कुटुंबात झाला. लहानपणापासूनच संगोळी रायन्ना हे काटक आणि धाडसी होते. याच गुणांचा फायदा त्यांना ब्रिटीशांविरुद्ध लढताना झाला.

कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होतं. त्यांना एक मुलगा होता. परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन झाले. त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि गादीवर बसवले. परंतु ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने या दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली. परंतु स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना. संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्माला बेल्लोन्गाल च्या किल्ल्यावर पकडण्यात आले. तिचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.

त्यानंतर मात्र संगोळी रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली. त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले.

स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता. जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते.
२६ जानेवारी १८३१ रोजी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नंदगड येथे रायान्ना यांना फाशी देण्यात आले.

१७९८: भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८३१)

संघयोगी श्री नाना ढोबळे – ( गोविंद श्रीधर तथा नाना ढोबळे )
१९४२ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर L.I.C. मध्ये काही काळ नोकरी केली. पण संघ ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना . त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन १९४४ पासून संघ प्रचारक म्हणून सुरवातीला भिवंडी तालुक्यात नियुक्ती झाली.

१९५० ते १९६२ कालावधीत धुळे जिल्हा प्रचारक हि जबाबदारी पार पडताना १९६२ ते १९७१ ह्या काळात नाशिक, धुळे, जळगाव विभाग प्रचारक हे दायित्व पार पडले. १९७१ ते १९८६ महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख हि जबाबदारी अखेर पर्यंत पार पाडली.
राष्ट्रनिष्ठ खंडोबल्लाळ,कथा देशभक्तीच्या, समाज तळातील मोती इ. ही त्यांची लेखन संपदा होती.

१५ ऑगस्ट , १९४७ ला झालेली देशाची दुर्दैवी फाळणी हा त्यांच्या मनावर झालेला आघात होता तर परत एकदा अखंड भारत हा त्यांचा सखोल चिंतनाचा व ध्यासाचा विषय अनेक बौद्धिक वर्ग तसेच वेळोवेळी केलेल्या भाषणातून मांडत होते.

१९८६ :संघयोगी नाना ढोबळे यांच्या संघ समर्पित जीवनाची अखेर. (जन्म : १ एप्रिल १९२४ )

  • घटना :
    १५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.
    १६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्यांदा) पराभूत केले.
    १८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
    १८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
    १९१४: पनामा कालव्यातून एस. एस. अॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.
    १९२९: संशोधक ग्राफ झेपेलिन हे बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.
    १९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
    १९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
    १९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
    १९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
    १९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
    १९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
    १९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
    १९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

• मृत्यू :

  • १९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)
    ••२००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९४१)

•२००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक तज्ञ बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी१९२७)
२०२४ :पद्मभूषण पुरस्कार सन्मानित राम नारायण अग्रवाल हे एक भारतीय एरोस्पेस अभियंता होते. ते अग्नी मालिकेतील पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या योगदानासाठी ओळखले जातात. त्यांना अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेचे जनक’ मानले जाते.
त्यांचा जन्म राजस्थानमधील जयपूर येथील एका व्यापाऱ्यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अग्रवाल यांनी कार्यक्रम संचालक (AGNI) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) प्रगत प्रणाली प्रयोगशाळेचे संचालक म्हणून काम केले आहे.

भारतीय एरोस्पेस अभियंता पद्मभूषण पुरस्कार सन्मानित राम नारायण अग्रवाल यांचे निधन.

  • जन्म :
    १८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर, १९२२)
    १८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)
    १८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे, १९४२)
    १९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)
    १९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)
    १९१७: लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)
    १९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म. ( मृत्यू :१५ मे, २००४ )
    १९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)
    १९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.
    १९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)
    १९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.
    १९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »