पंडित वेद व्यास सातवळेकर

आज शुक्रवार, सप्टेंबर १९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २८, शके १९४७
सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३७
चंद्रोदय : ०५:०० सप्टेंबर २०चंद्रास्त : १७:१२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – २३:३६ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – ०७:०५ पर्यंत
योग : सिद्ध – २०:४१ पर्यंत
करण : गर – ११:२७ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २३:३६ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : कर्क – ०७:०५ पर्यंत
राहुकाल : ११:०१ ते १२:३२
गुलिक काल : ०७:५८ ते ०९:२९
यमगण्ड : १५:३५ ते १७:०६
अभिजित मुहूर्त : १२:०८ ते १२:५६
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४२
दुर्मुहूर्त : १२:५६ ते १३:४५
अमृत काल : ०५:३५, सप्टेंबर २० ते ०७:१५, सप्टेंबर २०
वर्ज्य : १९:३५ ते २१:१५
‘पंडित वेदव्यास सातवळेकर’ – श्रीपाद सातावळेकर यांचा जन्म कोलगाव, सावंतवाडी येथे झाला. प्रामुख्याने कोलगाव, औंध, हैद्राबाद, पीठापुरम, कांगडी, लाहोर व पारडी या ठिकाणी त्यांचे वास्तव्य व कार्य झाले.
गाढा संस्कृताभ्यासक, प्रगल्भ वैदिक, प्रेरक साहित्यिक, कृतिशील राष्ट्रभक्त आणि प्रतिभाशाली चित्रकार असे विविध आयाम असलेले गेल्या शतकातील एक शतायुषी व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित श्रीपाद सातवळेकर!
पंडितजीचे घराणे वैदिकाचे असल्याने वेदाचे आणि व्याकरणशास्त्राचे त्यांचे अध्ययन घरीच झाले. त्यांचे चित्रकलेचे शिक्षण मात्र मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये झाले.
भारतीय संस्कृतीतील अत्यंत मौलिक गोष्टी म्हणजे चार वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता यांच्या निर्दोष, सटीप व सानुवाद आवृत्त्या लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी उभ्या केलेल्या स्वाध्याय मंडळाने वेदप्रसार आणि वैदिक विचारांचे प्रबोधन या दृष्टीने मोठी मौलिक कामगिरी बजावली. ‘संस्कृत स्वयं शिक्षक’ या मालिकेच्या २४ भागांमुळे संस्कृताचे दालन सर्वसामान्य जिज्ञासूंना खुले झाले. संशोधकाची वृत्ती आणि प्रसारकाची जिद्द अंगी बाळगून त्यांनी जी आजीवन वेदसेवा केली, तिचे फलित म्हणजे पारतंत्र्याच्या काळातील एक पिढी भारतीयांच्या सांस्कृतिक संचिताबद्दल अभिमान आणि आस्था बाळगणारी तयार झाली.
पंडितजींनी दीर्घकाळ चालविलेली ‘पुरुषार्थ’ (मराठी), ‘वैदिकधर्म’ (हिंदी), ‘वेदसंदेश’ (गुजराती), ‘अमृतलता’ (संस्कृत) ही नियतकालिके तसेच राष्ट्रीय दृष्टिकोनातून केलेले वेदविषयक लेखन, व्याख्यान इ. कार्य हे पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रीय अस्मिता रुजविण्यास, ती परिपुष्ट करण्यास आणि राष्ट्रभक्तीचा स्फुलिंग चेतविण्यास कारणीभूत ठरले. हैद्राबादहून प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘वैदिक राष्ट्रगीत’ हे पुस्तक जप्त करून सरकारने त्याच्या प्रती जाळून टाकल्या होत्या. १९०८ साली ‘विश्ववृत्ता’त प्रकाशित झालेल्या ‘वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’ या लेखामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषेतही लेखन केले होते. त्यांचे एकूण ४०९ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.
राष्ट्रीय शिक्षणाच्या हेतूने पंडितजींनी हैद्राबाद येथे विवेकवर्धिनी शाळा तसेच कन्याशाळा व व्यायाम शाळा सुरू केली. पुढे त्यांनी प्रत्यक्ष ‘राज्यकारणा’त भाग घेतला. सातारा काँग्रेस समितीचे अध्यक्ष, अन्याय्य कायदेभंगाचा पुरस्कार करणार्या सातारा जिल्हा परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष, जमखिंडीच्या संस्थान प्रजापरिषदेचे अध्यक्ष म्हणून पंडितजींनी संस्मरणीय कामगिरी केली. औंध संस्थानात ग्रामराज्यसंस्थापनेचा आराखडा आखून तो बॅ. अप्पासाहेब पंतांकडून राबविला. पंडितजींचे घर म्हणजे अनेक क्रांतिकारकांचे, भूमिगत कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान असे.
या सर्वांबरोबरच पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक चमकदार पैलू म्हणजे चित्रकार सातवळेकर! चित्रकला शिक्षक, औंध संस्थानाचे चित्रकार आणि व्यावसायिक चित्रकार अशा या प्रवासातील त्यांची प्रामुख्याने तैलरंगातील निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे उपलब्ध आहेत. औंध, मद्रास, हैद्राबाद, पीठापुरम, जयपूर, जोधपूर व लाहोर येथील संग्रहालयांत त्यांची चित्रे आहेत. लाहोरात त्या वेळी सातवळेकर स्टूडिओ प्रसिद्ध होता. फोटोग्राफर म्हणूनही त्यांनी मोठा नावलौकिक मिळविला होता. पंडितजींच्या चित्रकलेत वास्तवता, सौंदर्य व रेखीवपणा यांचा उत्कृष्ट मिलाफ आढळतो, असे कलासमीक्षक त्याविषयी गौरवाने म्हणतात.
पंडितजींचे आचरण म्हणजे साधेपणा, स्वावलंबन शुचिता व सात्त्विकता यांचा मूर्तिमंत परिपाठ होता. पंडितजींच्या या बहुपेडी कार्याचा गौरव राज्यकर्ते, विद्वान आणि सामान्य नागरिक या सर्वांनी हौसेने, कौतुकाने आणि कृतज्ञतेने केला. ब्रह्मर्षी, महामहोपाध्याय इ. पदव्यांनी त्यांना गौरविले. राष्ट्रपतींकडूनही त्यांचा सन्मान झाला. पंडितजींचे प्रकांड पांडित्य, प्रचंड साहित्यसंसार आणि लोकांचा वैचारिक पिंड घडविण्याची क्षमता लक्षात घेता, त्यांच्या चरित्रकाराने त्यांना दिलेली ‘वेदव्यास’ ही उपाधी सार्थ ठरते.
पंडित सातवळेकर यांची चित्रे फारशी उपलब्ध नाहीत. २६ जुलै २००५ रोजी मुंबईतील अतिवृष्टीच्या तडाख्यात त्यांचे चित्रकार पुत्र माधव सातवळेकर ह्यांच्या स्टुडिओत असलेली सातवळेकर पितापुत्रांची अनेक चित्रे नष्ट झाली.
१८६७ : चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. ( मृत्यू : ३१ जुलै, १९६८ )
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स – त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. तसेच सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे. २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.
२०२४ मध्ये सुनीता बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट मध्ये सहभागी झाल्या, पण तांत्रिक समस्यांमुळे त्या आणि बॅरी विल्मोर ९ महिन्यांहून जास्त काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्या त्या स्पेसएक्स क्रू-९ मोहिमेसह १८ मार्च २०२५ रोजी पृथ्वीवर परतल्या.
१९६५ : भारतीय – अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम यांचा अमेरिकेत क्लिव्हलँड ओहायो य्र्थे जन्म.
सुनीता यांस जन्मदिन शुभेच्छा
२०२२ : राम जन्मभूमी आंदोलनातले फायर ब्रँड वक्ते नेते आणि संत आचार्य धर्मेंद्रजी यांचे निधन . आचार्य धर्मेंद्र हे हिंदुत्व, हिंदुस्थान आणि धर्म यासाठी जगले. संपूर्ण आयुष्य त्यासाठी त्यांनी वाहून घेतले होते. गोरक्षेपासून रामजन्मभूमी आंदोलनापर्यंत सर्व आंदोलनांमध्ये ते अग्रणी राहिले.
- घटना :
१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.
२०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
२००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.
२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
• मृत्यू :
•१७२६ : छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन
•१९३६ : हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन ( जन्म : १० ऑगस्ट, १८६० )
•१९९२ : साहित्यिक , विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन ( जन्म : ७ नोव्हेंबर, १९१४ )
•१९९३ : म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन
•२००२ : मराठी रंगभूमी, चित्रपट तसेच दूरदर्शन वरील अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन ( जन्म : १९ ऑक्टोबर, १९५४ )
२००४ : सुप्रसिद्ध नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन ( जन्म : ५ सप्टेंबर, १९२८ )
•२००७ : मराठी संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन ( जन्म : १५ नोव्हेंबर, १९१७ )
- जन्म :
१९१२ : भारतीय पशु वैद्य व प्राणी संग्रहालय संस्थापक रूबेन डेव्हिड यांचा जन्म ( मृत्यू : २४ मार्च, १९८९ )
१९१६ : निर्माते व अभिनेते बाबुराव गोखले यांचा जन्म ( मृत्यू : २८ जुलै, १९८१ )
१९१७ : कॉन्टीनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म ( मृत्यू : ६ नोव्हेंबर, १९९८ )
१९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९८९)
१९५८ : गायक, अभिनेता, व गीतलेखक लकी अली यांचा जन्म