‘शुगरटुडे’च्या विशेषांकाचे पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशन

पुणे : महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि सहकार क्षेत्राला समर्पित एकमेव मराठी मासिक ‘शुगरटुडे’ने दीपावलीनिमित्त प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे पुण्यातील ऐतिहासिक पुस्तक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पुणे बूक फस्टिव्हलचे आयोजक राजेश पांडे, नॅशनल बूक ट्रस्टचे संचालक कर्नल युवराज मलिक, अभिनेते प्रवीण तरडे, सामाजिक कार्यकर्ते सीए राज देशमुख, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस ‘पुण्यनगरी’चे संपादक श्रीकांत साबळे, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, ‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक नंदकुमार सुतार , फ्रायडे क्लबचे आयोजक अलीभाई देखाणी, दिलीपजी, मराठेजी आदी नामवंतांची उपस्थिती होती. . तसेच पुण्याला दिशा देणाऱ्या फ्रायडे क्लब परिवारातील नामवंत सदस्यांचीही खास उपस्थिती होती.
‘साखर उद्योगातील तरुण नेतृत्त्व’ हा यावेळच्या विशेषांकाचा विषय आहे. तसेच रस्त्यावर भाजी विकणारा तरुण साखर कारखानदार झाला, ही खास मुखपृष्ठकथा आहे. साखर उद्योगासारख्या विषयाला संपूर्णपणे वाहिलेले अशा स्वरूपाचे हे पहिलेच मासिक असल्याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिंक क्रांती झाली आहे, असे प्रतिपादन राजेश पांडे यांनी यावेळी केले.
ग्रामीण भागाचे अर्थचक्र गतिमान करणाऱ्या या उद्योगातील घडामोडींची इत्थंभूत माहिती देण्याबरोबरच, शेतकरी आणि उद्योगाला तज्ज्ञांच्या लेखनीद्वारे मार्गदर्शनही ‘शुगरटुडे’तून होते, असे उद्गार सीए राज देशमुख यांनी काढले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेटचे सदस्य राजेश पांडे यांच्या पुढाकारातून पुणे बूक फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. यंदाचे पुस्तक महोत्सवाचे दुसरे वर्ष होते. यावेळी पुणे लिट फेस्टिव्हल म्हणजे पुणे साहित्य महात्सवाचेही आयोजन करण्यात आले. त्यात देशभरातील नामवंत लेखकांनी सहभाग घेतला. प्रख्यात लेखक शिव खेरा, ‘द हिडन हिंदू’चे लेखक अक्षत गुप्ता आदी लेखकांनीही आपले अंतरंग उलगडून दाखवले.
देशभरातील विविध भाषांमधील प्रकाशकांची तब्बल सातशे पुस्तक दालने महोत्सवात होती. दहा दिवसांच्या महोत्सवात सुमारे २५ लाख पुस्तकांची विक्रमी विक्री झाली. महोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर समारोप डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत झाला.