जन्म कवितेचा

शब्द वाचून कळले सारे कवितेला
अवघड शब्दांच्या पलिकडले कवितेला ॥
कवितेत शब्दची करिती शब्दांना निशब्द
शब्द यातनाच देती प्रसववेदना कवितेला ॥
कवितेसाठी सहनशीलतेचा केला कडेलोट
कठीण कठीण किती कवितेचा गर्भकाल ॥
आनंदे उमलती शब्दफुले कवितेच्या वेलीवर
अन दिसू लागला कवितेचा ऊषःकाल ॥
ओघळती शब्द होई नाद मधूर
वाहती शब्द होई कवितेचा निर्झर ॥
वापरा जपून शब्द हे अमोघ शस्र
बदलायला नाही ते कटीचे वस्त्र ॥
होता ध चा मा, न वाचवी काकाही
व्यर्थ जीव जाई नारायणाचाही ॥
होता सभेत शब्दांची फेकाफेक
फड जिंकून जाती एका मागून एक॥
कवितेतून मारले मी शब्द बाण
घायाळ करून,तो बसला उरात रूतून॥
कवितेने प्रेमाला जवळ केले
कवितेतून जग जवळ आले ॥
झाली सवय दु:ख झेलण्याची,
दृष्टी आली पल्याडचे बघण्याची ॥
तडजोड होईना हो तत्वांशी
गाठ पडेना हाताची तोंडाशी ॥
दोहे अभंग लावणी भारूड
ही सर्व कवितेचीच गारूड ॥
शोधून जगाच्या कल्याणासाठी
देती कवितेची विभुती जगजेठी ॥
रचनाकार: आहेर वा.र. (नासिक)
9958782982
कवी साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत सल्लागार आहेत.