ऊसतोड, कामगारांसाठी आरोग्यविषयक उपाययोजना करा – साखर आयुक्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर आयुक्तांच्या संबंधितांना सूचना

पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम २०२५ -२६ ची तयारी आणि त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ यांनी राज्यातील सर्व साखर कारखाने व त्यांच्या संघटना, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांना नुकत्याच परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत. यात प्रामुख्याने यंदाच्या गाळप हंगामात ऊसतोड व वाहतूक कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी तसेच विविध लसीकरण उपक्रमासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मदतीने तपासणी शिबिरे घ्यावीत. कारखानास्थळावर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच कामगारांसाठी स्वच्छतागृहांची उभारणीही करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी परिपत्रकाच्या माध्यमातून संबंधितांना दिल्या आहेत.

परिपत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कारखाना परिसरात वास्तव्यास येणाऱ्या ऊसतोडणी कामगार, महिला, विशेषतः बालकांकरिता स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृह बांधणे शक्य नसेल त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छतागृहांची, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यावी.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोडणी मजूर, मुकादम तसेच कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून सर्व साखर कारखान्यांनी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून शेती अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच ऊसतोडणी व वाहतूक शेतमजूर सुरक्षा विमा योजना याप्रमाणे गाळप हंगाम २०२५-२६ करिता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळामार्फत ऊसतोडणी कामगारांसाठी विमा योजना कार्यान्वित झाल्यास सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना या विमा योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »