वासुदेवानंद जयंती

आज बुधवार, ऑगस्ट १३, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २३, शके १९४७
सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १९:०७
चंद्रोदय : २१:५७ चंद्रास्त : ०९:५५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह: श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – ०६:३५ पर्यंत
क्षय तिथि : पञ्चमी – ०४:२३, ऑगस्ट १४ पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – १०:३२ पर्यंत
योग : धृति – १६:०५ पर्यंत
करण : बालव – ०६:३५ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १७:३० पर्यंत
क्षय करण : तैतिल – ०४:२३, ऑगस्ट १४ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १२:४३ ते १४:१९
गुलिक काल : ११:०७ ते १२:४३
यमगण्ड : ०७:५५ ते ०९:३१
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१८ ते १३:०९
वर्ज्य : २१:४९ ते २३:१९
वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी ) यांनी उज्जयिनीस श्रीनारायाणनंदसरस्वती स्वामींकडून दंड घेतला. स्वतः कर्म-भक्ती-योग-ज्ञान अशा उपासनामार्गांचा अवलंब करून त्यातील ध्येयपदवी प्राप्त करून. अनेक मुमुक्षु भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी तसेच दत्तभक्तीचा प्रचार करण्यात घालविले. ते दत्तप्रभूंच्या आदेशवरून कठोर नैष्ठिक सन्यस्त जीवन जगले. संपूर्ण जीवन महाराष्ट्रापासून हिमालयापर्यंत अनवाणी फिरून वैदिकधर्म व श्रीदत्तसंप्रदायाचा प्रचार केला.
संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती अशा अनेक वैशिष्ठ्यांनी संपन्न असणारे स्वामीजी उत्तम वैद्य, मंत्रसिद्ध, यंत्र-तंत्रज्ञ, उत्कृष्ठ ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यत्मिक साहित्यातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिद्धकवी, वक्ते, सिद्ध हठयोगी व उत्कृष्ठ दत्तभक्त होते.
त्यांनी श्रीदत्तपुराणासारख्या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती करून, अनादी दत्तसंप्रदायास एक संहिता व निश्चित तोंडावळा दिला, ज्यात वेदपादस्तुतीसारखी अलौकिक कृती समाविष्ट आहे. दत्तगुरूंच्या आज्ञेने घडलेल्या श्रीगुरुचरित्रासारख्या दिव्य ग्रंथाचा केवळ मराठी भाषेमुळे अखिल भारतीय भक्त आध्यात्मिक लाभ घेऊ शकत नव्हते, यासाठी यांनी सदर ग्रंथांची समश्लोकीसंहिता व द्विसाह्स्त्री संहिता नावाचे संस्कृत संक्षेप करून, सर्वांपर्यंत यातील भक्तीविज्ञान पोहचविले. स्त्रियांदिकांसाठी सप्तशती गुरुचरित्रसार नावाने यांनी गुरुचरित्राचा प्राकृतसंक्षेप केला. दकारादिसह्स्रनाम, सत्यदत्तव्रत अशा अनेक वैशिष्ट पूर्ण वाङमयाची व पंचपाक्षिक नावाने एक स्वतःची ज्योतिष पद्धती निर्माण केली. अनेक देवता सत्पुरुष नद्या इ.वर विपुल स्तोत्ररचना व अभंगरचना केली. त्यांनी रचलेली करुणात्रिपदी आणि इतर भक्ती रचना महाराष्ट्राच्या घराघरात आजही गायल्या जातात.
शके १७७६, श्रावण कृष्ण पंचमीस, रविवार दि.१३/०८/१८५४ “वासुदेव” अर्थात प.प. स्वामींचा जन्म झाला.
आज वासुदेवानंद जयंती आहे.
डावखुरे दिन – हा दिवस पहिल्यांदा १३ ऑगस्ट, १९७६ रोजी साजरा करण्यात आला. नावावरून या दिवसाची कल्पना कोणालाही येईल. दरम्यान, उजव्या हाताने काम करणे कधीही सोयीचे असते, अस समज समाजात आहे. हाच समज दूर करण्यासाठी आणि समाजातील डावखुऱ्या असणाऱ्या लोकांविषयी जागरुकता आणण्याच्या दृष्टीने हा दिवस साजरा करण्यात येतो.
जगाच्या लोकसंख्येपैकी 7 ते 10 टक्के लोक आपल्या डाव्या हाताने आपली सर्व कामे करतात. अर्थात हे लोक डावखुरे म्हणून ओळखले जातात. डाव्या हाताने काम करणारे काहीजण त्यांच्या उजव्या हातानेदेखील तेवढ्याच चपखलपणे काम करतात. पण हेच डावखुरे लोक आपल्या अद्वितीयपणा आणि अंगात वेगळ्या गुणामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात असेदेखील म्हटले जाते. त्याची इतिहासापासून ते आजपर्यंत उदाहरणे आहेत.
आज आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन आहे.
|| श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे ||
- बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.
बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.
जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘दिव्यरूपिणी सृष्टी’ भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भोवऱ्या’त पडून ‘जीवित केवळ करुणासंकुल’ झाले, मनाचा पारवा ‘खिन्न नीरस एकांतगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला मिळून ‘रात्रिचा’ ‘अवकाळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घुमा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल्लोळा’त ‘मायेच्या हिरव्या राव्या’ला दुखवून ‘जडता पसरलेला’ जीव ‘देहाचे पंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दूत’ बोलावू लागले.
१८९० : त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म ( मृत्यू : ५ मे , १९१८ )
रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे – शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले.
सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले.
त्यांनी बॉंबे मिल हॅंड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील स्वाभिमान कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.
मुंबईतील कापड गिरणी कामगारांच्या आंदालनामुळे ब्रिटिश शासनाने १८७५ मध्ये कापड-गिरण्यांमधील कामगारांच्या कामाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी व तीमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी एक आयोग नेमला. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दु:खाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते. १८८१ साली इंग्रज सरकारला कारखाना कायद्यात सुधारणा करणे भाग पडले. कामगारांना महिन्यातून चार भरपगारी रजाही मिळू लागल्या.
नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८९० मध्ये ‘मुंबई गिरणी कामगार संघ’ (बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन) नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापिली.
एप्रिल १८९० मध्ये दहा हजार स्त्री-पुरुष कामगारांची मोठी परिषद लोखंडयांनी मुंबईत भरविली. या परिषदेत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मुंबईतील औद्योगिक संघटनांच्या चळवळीतील ही महत्त्वाची घटना समजली जाते. त्यानंतर लगेचच १०जून, १८९० रोजी शासनाने, कामगारांना दर रविवारी पगारी सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला. १८९१ मध्ये कामगार कायदा संमत करण्यात येऊन लोखंडे यांच्या काही सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला. सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली. लोखंडे मूलतः निर्भीड वक्ते, झुंझार लेखक, संपादक व मुद्रक होते. ‘शिक्षणाद्वारे समजासुधारणा’ हे त्यांच्या विचारांचे ध्येय होते.
टिळक-आगरकर यांची कोल्हापूरच्या बर्वे प्रकारणात झालेली १०१ दिवसांची शिक्षा पूर्ण झाल्यावर १८८३ साली त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांना डोंगरी येथील तुरुंगापासून ते राणीच्या बागेसमोरील मेहेर मार्केटपर्यंत मिरवणुकीने आणण्यात लोखंडे यांनी पुढाकार घेतला होता. तसेच त्यांच्या सत्कार-समारंभांत लोखंडे हे अग्रभागी होते.
तसेच नारायण मेघाजी लोखंडे हे महात्माजोतीराव गोविंदराव फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत सहकारी होते.
मुंबईत १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.
१८४८ : इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील स्वाभिमान कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म ( मृत्यू : ९ फेब्रुवारी, १८९७)
- घटना :
१६४२ : क्रिस्टियन हायगेन्स यांनी मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
१८९८ : कार्ल गुस्ताव वीट यांनी ४३३ Eros या पृथ्वीजवळील पहिल्या उपग्रहाचा शोध लावला.
१९१८ : बायरिसचे मोटेर्न व्हेरके एजी ( B M W ) हि सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन केली
१९६१ : आपली नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने सीमा बंद केल्या व त्यातूनच बर्लिनची भिंत बांधण्यास सुरवात झाली.
• मृत्यू :
•१७९५ : मालवा घराण्याच्या महाराणी तसेच हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारात पुढाकार असणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे निधन (जन्म : ३१ मे , १७२५ )
१९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर, १८६१)
•१९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल, १९१०)
•१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन. ( जन्म: २ एप्रिल, १९०७ )
•२०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट, १९२८)
- २०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज ( मूळ नाव शांतीलाल पटेल )यांचे निधन. ( शांतीलाल पटेल ) (जन्म: ७ डिसेंबर १९२१)
२०१६ : निसर्गदत्त मूर्तिकला हि देणगी लाभलेले गणेश मूर्तिकार, शिल्पकार बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर यांचे निधन. ( जन्म : १२ ऑगस्ट, १९२६ )
२०१८ : लोकसभा सभापती, मा.क.प. नेते सोमनाथ चटर्जी यांचे निधन ( जन्म : २५ जुलै १९२९ ) - जन्म :
१८९८ : विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म (मृत्यू : १३ जुन, १९६९)
१९०६ : लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतांमण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म ( मृत्यू : ३० ऑक्टोबर, १९९८ )
१९३६ : पद्मश्री पुरस्कार सन्मानित हिंदी चित्रपट अभिनेत्री वैजयंती बाली उर्फ वैजयंतीमाला यांचा जन्म
१९८३ : भारताचा ९ वा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म.