‘तेरणा’च्या कथित विक्रीच्या काव्याविरुद्ध लढा उभारणार
धाराशिव : तालुक्यातील ढोकी येथील भाडे तत्त्वावर असणारा तेरणा साखर कारखाना विक्री करुन खासगी उद्योजकाच्या घशात घालण्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डाव असल्याचा आरोप सभासद व कामगारांनी केला असून याप्रकरणी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार तेरणा संघर्ष समितीने केला आहे.
सहकारी तत्त्वावरील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची विक्री करण्याची चर्चा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काही दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात चर्चेसाठी येथील दत्त मंदिराच्या सभागृहात सभासद, कर्मचारी व व्यावसायिकांची रविवारी तेरणा संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली.
यात कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची विक्री करुन खासगी उद्योजकाच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार करण्यात आला.
कारखान्याची गट क्रमांक २४२ मधील जमिनीसह मालमत्ता विक्री करण्यास विरोधाचा निर्णय झाला. कामगारांच्या थकीत भविष्य निर्वाह निधीच्या पैशासाठी पाठपुराव्याचा निर्णयही झाला. जिल्हा बँकेवर नेमलेल्या संनियंत्रण समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची भेट घेऊन कारखाना विक्रीच्या प्रयत्नास विरोध दर्शवण्याचा निर्णय घेतला. बैठकीस ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे, माजी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, डी. एम. पाटील, अनंतराव पडवळ, वाकुरे इ. उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक तसेच तेरणा साखर कारखान्याचे अवसायक विजय घोणसे पाटील यांच्यावर बैठकीदरम्यान सभासद व कामगारांचा रोष होता. त्यामुळे घोणसे पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली.
सध्या हा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला आहे. हा समूह राज्याचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करतो.