तेरणा साखर कारखान्याला प्रदुषण नियंत्रण मंडळाची नोटीस

धाराशिवच्या राजकारणात पुन्हा नवा कलगीतुरा!
तेर(धाराशिव) : ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून नदी पात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याने मोठे जलप्रदूषण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, गेल्या १५ दिवसांपासून तेर गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कारखान्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
प्रदूषणाचे स्वरूप आणि परिणाम
- तेरणा नदीला जोडणाऱ्या अबोळा ओढ्यातून कारखान्याचे दूषित पाणी नदीपात्रात आले आहे.
- संत गोरोबा काका मंदिर परिसरातील बंधाऱ्यात हे मळीयुक्त पाणी साचल्याने संपूर्ण पाणी दूषित झाले आहे.
- पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित झाल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे.
राजकीय वाद पेटला
या प्रदूषणामुळे धाराशिवच्या राजकारणात नवा कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
- आ. राणाजगजितसिंह पाटील (भाजप) : त्यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला, ज्याचा परिणाम म्हणून प्रदूषण मंडळाने नोटीस बजावली आहे.
- आ. तानाजी सावंत (शिंदे सेना): दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आ. पाटील यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका केली होती. आता या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून आ. पाटील यांनी सांवत यांच्या नियंत्रणाखालील कारखान्याला घेरल्याचे दिसत आहे.
प्रशासकीय कारवाई:
तेर ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदूषण मंडळाकडे धाव घेतली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पंचनामे पूर्ण केले असून, आता कारखान्याला नोटीस धाडण्यात आली आहे. या कारवाईमुळे तानाजी सावंत आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






