तेरणा कारखाना भैरवनाथ शुगरकडेच राहणार
ट्वेंटीवन शुगरची याचिका फेटाळली
उस्मानाबाद : मराठवाड्यातील सर्वात जुना साखर कारखाना असलेल्या ढोकी येथील तेरणा साखर कारखाना २५ वर्षांसाठी श्री भैरवनाथ शुगरकडेच राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री भैरवनाथ शुगर राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची कंपनी आहे.
या संबंधीचा निर्णय गुरुवारी (दि.२२) डीआरएटी (कर्जवसुली अपीलीय न्यायिक प्राधिकरण) ने दिला. त्यामुळे आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरला मोठा धक्का बसला. त्यांची याचिका फेटाळून लावली. या निकालानंतर तेरणा कारखाना परिसरात कर्मचाऱ्यांनी व ढोकी येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
तेरणा साखर कारखाना ३१२ कोटी रुपये कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. यात २५ नोव्हेंबर २०२१ रोजी तेरणा कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला.
या प्रक्रियेच्या विरोधात देशमुख यांच्याशी संबंधित ट्वेंटीवन शुगरने, ‘जिल्हा बँकेने निविदा प्रक्रिया नियमानुसार राबवली नाही. तसेच आमची निविदा इतरांपेक्षा जास्त रकमेची असताना या प्रक्रियेत सहभागापासून रोखले,’ असा आरोप करुन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर ही निविदा प्रक्रिया प्रकरण डीआरटी न्यायाधिकरण ते उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात, परत डीआरटी न्यायाधिकरणात चालू होते.
डीआरटी न्यायाधिकरणाने दि. १७ जून रोजी ट्वेन्टीवन शुगर-ची याचिका निकाली काढली. तसेच तत्कालीन जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने राबवलेली प्रक्रिया योग्य ठरवल्याने तेरणाचा ताबा भैरवनाथ शुगरला मिळणार होता. परंतू २७ जून रोजी डीआरटीच्या निर्णयाविरोधात ट्वेन्टी वन शुगरने डीआरएटी (ऋण वसुली अपिलीय न्यायाधिकरण) मध्ये धाव घेतली.
गेल्या सहा महिन्यापासून डीआरएटी मध्ये तेरणा संदर्भात वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक, अवसायक तेरणा साखर कारखाना, ट्वेंटी वन शुगर व भैरवनाथ शुगर यांच्यात तेरणाच्या निविदा प्रक्रियेवरून वाद प्रतिवाद झाले. गुरुवारी (२२ डिसेंबर) यावर डीआरएटी न्यायालयाने अंतिम निकाल दिला.
सहा दिवसाचा मनाई आदेश
डीआरटी कोर्टाने जिल्हा बँकेची निविदा प्रक्रिया योग्य ठरवत ट्वेंटीवनची याचिका फेटाळली असली, तरी ट्वेंटीवनच्या मागणीनुसार उच्च न्यायालयात या निकालाच्या विरोधात अपील करण्यासाठी सहा दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. या अवधीत जिल्हा बँकेने तेरणा कारखाना संदर्भात पुढील कोणताही निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
डॉ. सावंत यांच्या अधिपत्याखालील भैरवनाथ शुगरच्या बाजुने तेरणा कारखान्याचा निकाल लागल्याने उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघासह लातूर तालुक्यातील काही भाग असे १२७ गावांचे कार्यक्षेत्र व ३४ हजार सभासद असलेल्या तेरणावर वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याने सावंत यांची राजकीय ताकद वाढणार आहे.
करार काय सांगतो?
निविदा प्रक्रियेतून पाच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा तेरणा साखर कारखाना भैरवनाथ शुगरने पंचवीस वर्षांसाठी घेतला आहे. त्यासोबतच कारखान्याची २६२ एकर जमीन तसेच ४० किलो लिटर क्षमतेचा आसवनी प्रकल्प, १४ मेगावॅटचा वीज प्रकल्प भैरवनाथ शुगरच्या अधिपत्याखाली २५ वर्ष आला. गेल्या दहा वर्षापासून बंद असलेल्या तेरणा कारखान्यास ऊर्जितावस्था प्राप्त होणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
वर्षभरात ५ वेळेस २१ शुगर समूह कोर्टात गेले होते. हा न्यायालयीन वाद गेली वर्षभर सुरु होता. या निकालामुळे आता तेरणेचा मार्ग आता सुकर झाला आहे.
तेरणा सहकारी साखर कारखान्यावर भविष्य निर्वाह निधी, जीएसटी वस्तु सेवा कर, महावितरण, राज्य उत्पादन शुल्क यांची थकबाकी आहे. तेरणा सहकारी साखर कारखाण्याचे ३५ हजार सभासद असून किमान १२० गावात सभासद आहेत.
या कारखान्यात १५०० हजार कर्मचारी असून त्यांना आता रोजगार उपलब्ध होणार आहे. तेरणा कारखाना सुरू झाला तर ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांचे तेरणा साखर कारखाण्यावर वर्चस्व होते. तसेच, उध्दव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडेसुध्दा तेरणा कारखाना होता.