देशभरातील साखर कारखान्यांवर आता केंद्राची नजर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : देशभरातील साखर कारखान्यांन्यांच्या कामकाजावर आता केंद्र सरकारची नजर राहणार आहे. नुकतेच केंद्रीय सहकार मंत्रालयाने देशभरातील सर्व राष्ट्रीय साखर सहकारी कारखाना संघ, तसेच इतर सर्व सहकारी महासंघांना सदस्य कारखाने, सभासद शेतकरी आणि संबंधित मजुरांशी सातत्याने संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामळे सर्वच कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कृष्ण पाल आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीत हे निर्देश दिले आहेत.

या बैठकीदरम्यान, सहकारी चळवळीची दृश्यमानता वाढवण्यासाठी धोरण मजबूत करण्यावर भर देण्यात आला. नॅशनल फेडरेशनला ८.५ लाख सहकारी संस्थांपर्यंत योजनांची माहिती, तसेच विविध यशोगाथा व नवीन संस्थांची माहिती व्हॉटस्अॅप, ई-मेल, एसएमएस आणि प्रत्यक्ष संवादाद्वारे देण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे कामकाजाबाबतची माहिती केंद्र सरकारला सतत मिळणार असल्याने साखर कारखान्यांच्या दैनंदिन कामकाजावर केंद्रीय सहकार मंत्रालयाची आता नजर राहणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्देशानुसार, कारखान्यांनी शेतकरी व कामगारांशी संवाद वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा सक्रिय वापर करावा. या माध्यमांचा उपयोग केवळ सरकारी धोरणे आणि योजनांची माहिती देण्यासाठीच नाही, तर स्थानिक समस्या, उत्पादनातील आव्हाने आणि शेतकऱ्यांची आजमावण्यासाठीही व्हावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे साखर उद्योग क्षेत्रातील काही जाणकारांनी समाधान व्यक्त करत साखर उद्योगात येणाऱ्या अडचणींवर चर्चा होऊन त्या दूर होण्यास मदत होईल, अशा प्रतिक्रियाही काही जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.  

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »