‘एनसीएल’च्या विद्यार्थ्यांची किमया : फक्त ६७५ रुपयांत घरगुती गॅस!

आवडल्यास ही बातमी शेअर करा


पुणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) वाढत्या किमतींना आता एक स्वस्त आणि ‘अस्सल देशी’ पर्याय उपलब्ध झाला आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) ११ विद्यार्थ्यांनी मिथेनॉलपासून ‘डायमिथील इथर’ (DME) हा ज्वलनशील गॅस तयार करण्यात यश मिळवले आहे. २०१८ पासून अकरा विद्यार्थ्यांनी या प्रकल्पावर काम केले. त्यांनी केवळ प्रयोगच केला नाही, तर संस्थेत ‘डीएमई’ गॅस निर्मितीचा एक छोटा कारखानाच (Pilot Plant) उभा करून यशस्वी उत्पादन करून दाखवले.


बातमीचे मुख्य तपशील
स्वस्त पर्याय:
एलपीजीच्या तुलनेत हा गॅस १० ते १५ टक्क्यांनी स्वस्त असेल.
अंदाजित किंमत: १४ किलोचा सिलिंडर साधारण ६७५ रुपयांत (म्हणजेच ४८ रुपये किलो दराने) मिळू शकतो.
स्वदेशी बनावट: परदेशातून गॅस आयात करण्याऐवजी आपण आपल्याच देशात हा गॅस तयार करू शकतो, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
फायदा काय?
हा गॅस भविष्यात एलपीजीला उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे सामान्य नागरिकांचे पैसे वाचतील आणि भारताचे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

...या विद्यार्थ्यांनी केला प्रयोग यशस्वी
आकाश भटकर (पीएच. डी. विद्यार्थी, पुणे) हे टीम लीडर असून, शीतल गवळी (तुळजापूर), समृद्धी माने (अहिल्यानगर), मणिकंदन (तामिळनाडू), प्रवीण (तामिळनाडू), पेरिस्वामी (तामिळनाडू), अश्विनी (केरळ), नाझरीन (केरळ), आदिती कांबळे (मुंबई), आकाश यादव (उत्तर प्रदेश), शिवप्रसाद (हैदराबाद) या विद्यार्थ्यांनी अहोरात्र झटून हे संशोधन केले. त्यांना ‘एनसीएल’च्या कॅटालिस्ट विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी. राजा आणि संचालक डॉ. आशिष लेले यांनी मार्गदर्शन केले आहे.


१२ हजार तास चालणारा जगातील पहिला प्रयोग विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही तब्बल १२ हजार तास हा प्लांट चालवून पाहिला आहे, असा प्रयोग जगात प्रथमच आम्ही केला आहे. मिथेनॉल तयार करण्याचे विविध मार्ग आहेत. घनकचऱ्यापासूनही तो करता येतो. मिथेनॉलपासून ‘डीएमई’ (डायमिथील इथर) तयार केले. यात ऑक्सिडाईज मेटलपासून एक उत्प्रेरक तयार केला, तोच आमचे पेटंट आहे. या उत्प्रेरकामुळे आम्हाला स्वच्छ प्रदूषणविरहित असा ‘डीएमई’ गॅस निर्माण करता आला. दोन मिथेनॉलचे रेणू जेव्हा उत्प्रेरकाच्या संपर्कात घेऊन उष्णता दिली गेली, तेव्हा डायमिथील इथर आणि पाणी तयार झाले. यातून पाणी काढून टाकले तेव्हा शुद्ध स्वरूपात ‘डीएमई’ हा द्रवरूपात मिळाला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »