राज्याचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात!

राज्यात १० कोटी टन ऊस गाळप पूर्ण; ७७ साखर कारखान्यांची धुराडी बंद
पुणे: राज्यातील २०२५-२६ चा साखर हंगाम आता वेगाने समाप्तीकडे झुकत आहे. वाढीव गाळप क्षमतेमुळे अनेक जिल्ह्यांतील ऊस लवकर संपल्याने आतापर्यंत राज्यातील एकूण २१० पैकी ७७ कारखान्यांनी आपले कामकाज थांबवले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, तेथील सर्वाधिक २० कारखाने बंद झाले आहेत.
राज्यातील ऊस गाळप हंगाम दिनांक 1 नोव्हेंबरपासून सुरू झाला होता. साखर आयुक्तालयाकडून ऊस गाळप परवाने ऑनलाईन पद्धतीने कारखान्यांना वितरित करण्यात आले होते. राज्यात यंदा गतवर्षापेक्षा अधिक उसाची उपलब्धता असल्यामुळे अधिक ऊस गाळप पूर्ण होऊन साखर उत्पादनही जादा झाले आहे.
गेल्यावर्षी 2024-25 मध्ये 200 साखर कारखान्यांकडून 25 फेबुवारी 2025 अखेर 853 लाख 96 हजार मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण झाले होते. तर, प्रत्यक्षात 80.94 लाख मेट्रिक टनांइतके साखर उत्पादन हाती आले. सद्य:स्थितीत राज्यात गतवर्षापेक्षा 148 लाख मेट्रिक टनांनी ऊस गाळप वाढले आहे. तर, 13 लाख मेट्रिक टनांनी साखर उत्पादनही वाढल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसांपासून राज्यातील साखर कारखाने बंद होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. सद्य:स्थितीत जिल्हानिहाय स्थिती पाहता सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 20 साखर कारखाने ऊस संपल्याने बंद झालेले आहेत. तसेच, कोल्हापूर 14, सांगली 11, सातारा 8, पुणे 3, धाराशिव 2, अहिल्यानगर 11, नाशिक 4, नंदुरबार 2, हिंगोली 1 आणि भंडारा जिल्ह्यातील 1 मिळून 77 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.





