सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांचे कार्य समाजविकासासाठी दीपस्तंभ : बाळासाहेब थोरात

संगमनेर: “स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार, शेती, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात दिलेले योगदान अजरामर आहे. त्यांचे तत्त्वनिष्ठ जीवन आणि समाजहित जपण्याचे कार्य पिढ्यानपिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
१२ जानेवारी रोजी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण संगमनेर तालुक्यात ‘प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे यांसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
मूल्यांची जपणूक: भाऊसाहेब थोरातांनी आयुष्यभर निष्ठा, शिस्त आणि काटकसर या मूल्यांचे पालन केले.
स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते: सहकाराच्या माध्यमातून त्यांनी केवळ संस्था उभारल्या नाहीत, तर पारदर्शक कारभार करणारे चारित्र्यवान कार्यकर्तेही घडवले.
विकासाचे राजकारण: “राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असावे,” हा विचार त्यांनी कृतीतून मांडला.
विविध उपक्रमांनी तालुका गजबजला
प्रेरणा दिनानिमित्त संगमनेर तालुक्यात गावोगावी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने: प्रभात फेरी आणि स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिर, वक्तृत्व, निबंध आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन, कृषी प्रदर्शन आणि भाऊसाहेब थोरात क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..






