यंदाची दिवाळी उत्साहवर्धक आणि फायदेशीर – राजेंद्र बाठिया
पुणे : यंदाच्या दिवाळीत बाजारपेठांमध्ये सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही ही दिवाळी भरभराटीची ठरली आहे. व्यापार, उद्योग, सेवा, बांधकाम, कृषी यासारख्या सर्वच क्षेत्रांनी यंदा मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. सणासुदीच्या काळात खरेदी-विक्री जोरात झाली , असे निरीक्षण दि पूना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी नोंदविले आहे.
विविध उद्योग क्षेत्रांमध्ये सोने-चांदी, कापड, मिठाई, ड्रायफ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बांधकाम साहित्य, वाहन, पर्यटन, घरगुती उपकरणे अशा वस्तूंच्या खरेदीत मोठी वाढ दिसून आली. यामुळे छोटे-मोठे सर्वच व्यापारी, कामगार, अधिकारी आणि उद्योगपतींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. यंदा ऑनलाइन खरेदीबरोबरच ऑफलाईन बाजारातही ग्राहकांनी खरेदीचा आनंद लुटला. एका अहवालानुसार, ग्राहकांनी प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे अधिक ओढा दिसला. त्यामुळे बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत होत्या. अनेक दुकानदारांच्या मते, ऑनलाइन खरेदीला काहीसा फटका बसला असला तरीही, प्रत्यक्ष बाजारात खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे उलाढाल उल्लेखनीय पातळीवर पोहोचली, असे बाठिया यांचे मत आहे.
ते पुढे म्हणाले, ” दिवाळीनिमित्त कामगार वर्गाला बोनस मिळाल्याने त्यांच्याही खरेदी क्षमतेत वाढ झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकांचे वातावरण असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठांवर झाला. कामगार वर्गाने मोठ्या उत्साहाने खरेदी केली.शेतकरी वर्गालाही यंदा त्यांच्या उत्पन्नाचा चांगला भाव मिळाल्याने त्यांची खरेदी क्षमताही वाढली. दिवाळीच्या सणाच्या काळात शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी देखील खरेदीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. त्यांच्या खरेदीमुळे ग्रामीण भागातील बाजारपेठाही मोठी उलाढाल झाली.”
दिवाळीच्या हंगामात अनेक नव्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बाजारातील वाढत्या मागणीमुळे हमाल, कामगार, दिवाणजी यांसारख्या श्रमिकांची कमतरता जाणवू लागली आहे. कामगार वर्गाचे उत्पन्न वाढल्याने त्यांचे जीवनमानही सुधारले आहे, आणि यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे.भारताच्या उद्योग क्षेत्रात वाढ झाल्याने सरकारचे उत्पन्नही वाढले आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला त्यांच्या विविध पायाभूत प्रकल्पांसाठी अधिक भांडवल उपलब्ध होईल,अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. सरकारच्या विकास योजनांना योग्य गती मिळाल्यास देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला अजूनच चालना मिळू शकते, असे बाठिया यांचे म्हणणे आहे.
सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये आलेली चैतन्य व उलाढाल पाहता अर्थव्यवस्थेत एक सकारात्मक ऊर्जा संचारली आहे. व्यापारी आणि ग्राहक दोन्हींकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे येणाऱ्या काळात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे बाठिया यांचे म्हणणे आहे.