यंदाचा गाळप हंगाम राहणार १५० दिवसांचा !

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यात यंदाचा गाळप हंगाम हा मार्च २०२६ अखेर म्हणजेच किमान १४५ ते १५० दिवस सुरू राहणार असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयाच्या परिपत्रकावरून दिसून येतो.  दरम्यान, कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, याचे नियोजन प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालय आणि साखर आयुक्तालय स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळे कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही, याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब न करण्याचे आवाहन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.

…तर ऊसतोडणी मजूर, मुकादमांकडून रक्कम वसुली करणार

उसाची तोडणी करताना ऊस पीक चांगले नाही, ऊस पडलेला आहे,  तोडणी करणे परवडत नाही, अशी वेगवेगळी कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची, वस्तू व सेवांची मागणी केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देउन साखर आयुक्तांनी  शेतकऱ्यांनी केलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास ही रक्कम मजूर-मुकादम किंवा वाहतूक कंत्राटदारांच्या बिलातून कारखान्यांनी वसूल करून शेतकऱ्यांना देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

राज्यातील सर्व प्रादेशिक साखर सह संचालकांसह सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, खासगी कारखान्यांचे सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल, असे पाहावे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन, व्हॉटसअॅप क्रमांक जारी करून शेतकऱ्यांना माहिती द्यावी. तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमूणक करून गावपातळीवर शेतकऱ्यांपर्यंत माहिती द्यावी. लेखी स्वरूपात आलेल्या तक्रारीवर सात दिवसांत निराकरण करावे. त्यात समाधान न झाल्यास शेतकरी प्रादेशिक साखर सह संचालकांकडेही तक्रार करू शकणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »