थोरातांचे विखेंना चिमटे, ‘गणेश’च्या हंगामाची सांगता
नगर : ‘त्यांनी’ कर्ज मिळविण्यात अडथळा आणला नसता, तर गणेशने साडे तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असते. त्यांना कारखाना चालवायचा नव्हता आणि आता आम्ही चालवत आहोत, हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.
गणेश साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे मार्गदर्शक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यकारी संचालक नितीन भोसले, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. एकनाथ गोंदकर, अॅड. नारायण कार्ले, गंगाधर चौधरी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, वंदना मुरकुटे, सचिन गुजर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून हंगामाची सांगता करण्यात आली.
थोरात म्हणाले की, गणेश कारखाना परिसरात आज दिवाळी सारखे आनंदाचे वातावरण आहे. गेल्या आठ वर्षांत असे वातावरण नव्हते. त्यांनी पेट्रोल पंपसुद्धा तिकडून चालवला आणि कामगार देखील तिकडून आणले होते. आम्ही कधीही येथे येऊन बसलो नाही. तरीही गणेश उत्तम चालला. अडचणी खूप आहेत. मात्र गणेश चालवू शकतो, असा आत्मविश्वास सभासदांत निर्माण झाला.
युवा नेते विवेक कोल्हे सत्ताधारी असल्याने त्यांचे ऐकले जाते. त्यांनी निळवंडे व गोदावरी कालव्यातून एक आवर्तन मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन करून ‘गणेश कारखान्याचा गळीत हंगाम संचालक मंडळ आणि सभासदांनीच यशस्वी केला. मी आणि विवेक कोल्हे यांनी फक्त त्यांनी लावलेल्या उट्या (अडथळे) दूर करण्याचे काम केले’, असेही थोरात म्हणाले.
कार्यकारी संचालक नितीन भोसले व अध्यक्ष सुधीर लहारे यांचीही भाषणे झाली.
यंदा गणेश कारखाना जिल्ह्यातील पहिल्या पाच कारखान्यांत आला आहे. 2 लाख 15 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. साठ ते सत्तर कोटी रुपये किमतीची साखर गोदामात शिल्लक आहे. मात्र विरोधकांनी माल तारण कर्ज रोखले. त्याबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. येत्या एप्रिलपर्यंत उत्पादकांची देणी दिली जातील. कामगारांची 7 कोटी 65 लाख रुपयांची देणी अदा केली आहेत, असे विवेक कोल्हे यांनी सांगितले.