काटमारीच्या मुद्यावरून थोरातांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

संगमनेर : काटमारीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर कारवाई करणार असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करायलाच हवी. जेणेकरून यातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार असल्याचे मत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सोमवारी कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, कारखान्याचे माजी अध्यक्ष बाबा ओहोळ, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत यांसह संपत डोंगरे, लक्ष्मण कुटे, संचालक संतोष हासे, संपत गोडगे, डॉ. तुषार दिघे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
मोठी स्पर्धा असल्याने उसाची पळवापळवी होणार
कारखानदारीमध्ये मोठी स्पर्धा असल्याने उसाची पळवापळवी होणार आहे. थोरात कारखान्याने १५ लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील सभासद व ऊसउत्पादकांचा कारखान्यावर कायम मोठा विश्वास राहिला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे, असेही थोरात म्हणाले.
उसाला प्रतिक्विंटल ३२०० रुपये भाव देणार
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम काटकसर, अचूकता व पारदर्शक निर्णय घेत चांगली वाटचाल केली आहे. यावर्षी कारखाना उसाला प्रतिक्विंटल ३२०० रुपये भाव देणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.