थोरात कारखान्याचा 3015 रु. दर, कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

संगमनेर — सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन 3015 रुपये प्रमाणे दर जाहीर केला आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सन 2024-25 हंगामासाठीचे कारखान्याचे बॉयलर प्रदीपन आ. थोरात यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या वारशातून मिळालेल्या आदर्श शिस्तीवर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था काम करत असून या संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण झाली आहे. एकरी जास्तीत जास्त उत्पादन वाढवताना कार्यक्षेत्रात 10 लाख टनापेक्षा जास्त ऊस निर्माण झाला पाहिजे. चांगला सहकार व चांगली संस्कृती आपण जपायची आहे, असे उद्‌गार आमदार थोरात यांनी काढले.

कारखान्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळीनिमित्त सर्व कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, संतोष हासे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकर खेमनर, लहानभाऊ गुंजाळ, आर.बी. राहणे, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, चंद्रकांत कडलग, अर्चना बालोडे, मीरा शेटे, निर्मला राऊत, निर्मला गुंजाळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, सहकारी संस्थांमुळे संगमनेरची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. येथील अर्थव्यवस्था समाजजीवन आणि प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा नक्की प्रभाव दिसत आहे. कारखान्याने कायम चांगला भाव दिला असून यामुळे शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी या सर्वांमध्ये आनंद आहे. थोरात कारखान्यावर शेतकरी, सभासद, आणि कार्यक्षेत्राबाहेरी ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास असून हा विश्वास हेच कारखान्याचे भांडवल आहे.

निळवंडेच्या पाण्यामुळे दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी याचा नक्कीच लाभ होणार आहे. कारखान्याने यापूर्वी 2800 रुपये प्रति टन भाव दिला असून दिवाळीनिमित्त 215 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून 3015 रुपये असा भाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर व्हा.चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सभासद ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »