आजचे पंचांग

आज रविवार, जुलै २८, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ६, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१६
चंद्रोदय००:२९, जुलै २९ चंद्रास्त : १२:५६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – १९:२७ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – ११:४७ पर्यंत
योग : शूल – २०:११ पर्यंत
करण : बालव – ०८:२० पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १९:२७ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १७:३८ ते १९:१६
गुलिक काल : १६:०० ते १७:३८
यमगण्ड : १२:४५ ते १४:२३
अभिजितमुहूर्त : १२:१९ ते १३:११
दुर्मुहूर्त : १७:३२ ते १८:२४
वर्ज्य : ०७:५९ ते ०९:३१
वर्ज्य : २१:०२ ते २२:३५
|| घनश्याम सुंदरा, श्रीधरा |
अरुणोदय झाला ||
|| उठिं लौकरि वनमाळी
उदयाचळीं मित्र आला ||
लता मंगेशकर आणी पंडितराव नगरकर यांच्या स्वरातील, (व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ या चित्रपटातील ) शाहिर होनाजी बाळा यांच्या अजरामर शब्द कलाकृतीने सजलेल्या ही भूपाळी. यामध्ये सावळ्या श्रीकृष्णाला निद्रेतून जागवण्यासाठी पहाटेच्या प्रसन्न सृष्टीचं वर्णन केलं आहे. क्षितिजांचा मित्र असलेल्या सूर्य नारायणाच्या आगमनाने सर्व दिशेला पसरलेली तेजोमय लालिमा, पक्ष्यांची मंजुळ किलबिल, गाईचे वासरांसाठी वात्सल्यपूर्ण हंबरणे आणि भल्या पहाटे अंगणात सडा सारवण करुन सुबक रांगोळी काढणाऱ्या गोपिकांचे सुंदर चित्रण करण्यात आलं आहे.
कृष्णधवल चित्रपटामधील ही भूपाळी संध्या, पंडितराव नगरकर, ललिता पवार आणि अन्य सह कलाकारांवर चित्रित करण्यात आली आहे. कोटी-कोटी सूर्यांच्या तेजापेक्षा अधिक तेजस्वी मुखकमळ असलेल्या श्रीकृष्णाच्या नामस्मरणात दंग झालेल्या शाहीर होनाजी बाळा यांची ही अमर भूपाळी आजही टवटवीत आणि सुमधुर वाटते.
नगरकरांचे पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु ‘पंडितराव’ याच नावाने ते प्रसिद्ध झाले.
लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला.
मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. हरिभाऊ शुक्ल यांच्या ‘मंगला’ नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या.
‘संशयकल्लोळ’ तसेच खाडिलकर यांचे ‘संगीत त्रिदंडी-संन्यास’ ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’, ‘सौभद्र’, ‘लग्नाची बेडी’, ना. सी. फडक्यांचे ‘संजीवन’ इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’च्या ‘देहूरोड’ या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले. शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या ‘पिकली पाने’ या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. ‘लग्नाची बेडी’, ‘एकच प्याला’मधल्या संगीत भूमिका ते शेवटपर्यंत करत होते. मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली.
१९७७ : गायक व अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन (जन्म : २६ डिसेंबर १९१०)
चित्रपट दिगदर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. नवयुग फिल्म कंपनीत र.शं. जुन्नरकर यांच्या हाताखाली संकलक म्हणून राजा ठाकूर काम पाहू लागले. जुन्नरकर नवयुग सोडून गेल्यावर राजा ठाकूर यांनी नवयुगच्या ‘क्या तराना’, ‘पन्ना’, ‘शिकायत’ या तीन चित्रपटांचे स्वतंत्रपणे संकलन केले.
त्यानंतर ठाकूर यांनी राजा परांजपे यांना ‘बलिदान’ (१९४८) या चित्रपटासाठी दिग्दर्शन साहाय्य केले व संकलनही केले. पुढे राजा परांजपे यांच्या गाजलेल्या ‘जिवाचा सखा’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटांचे संकलनही राजा ठाकूर यांनीच केले. राजा परांजपे व ग.दि. माडगूळकर यांनी पुण्यात ‘नवचित्र’ ही चित्रपट संस्था स्थापन केली. ‘बोलविता धनी’ (१९५२) हा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी ‘रेशमाच्या गाठी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.
राजा ठाकूर यांनी १९५४ च्या सुमारास स्वत:ची चित्रपटसंस्था स्थापन केली. त्यांनी १९५५ मध्ये ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रेक्षक व समीक्षक, दोघांच्याही पसंतीला उतरलेल्या या चित्रपटासाठी राजा ठाकूर यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटासाठीचा ‘रजतकमल’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या ‘उतावळा नारद’ मध्ये ठाकूर यांनी हिंदीतील प्रख्यात विनोदी नट भगवान याला मराठीत प्रथमच संधी दिली. चिमणराव व गुंड्याभाऊ या चि.वि. जोशींच्या मानसपुत्रांवर आधारित विनोदी चित्रपट ‘घरचं झालं थोडं’ (१९५७) याची निर्मिती केली. यात दामूअण्णा मालवणकर व विष्णुपंत जोग यांच्या भूमिका होत्या.
त्यांचा ‘रंगल्या रात्री अशा’ हा चित्रपट १९६२ मध्ये प्रदर्शित झाला. अत्यंत यशस्वी ठरलेल्या या चित्रपटातून जगदीश खेबुडकर यांचे गीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत आगमन झाले. या चित्रपटालाही ‘रजतकमल’ या पुरस्काराने गौरवले. ‘गजगौरी’ हा प्रभात फिल्मचा शेवटचा चित्रपट राजाभाऊंनी दिग्दर्शित केला होता. यानंतर त्यांनी ‘राजमान्य राजश्री’, ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘पाहू रे किती वाट’, ‘एकटी’, ‘मुंबईचा जावई’ यासारखे मराठी चित्रपट रसिकांना दिले. त्यातील १९६८ मध्ये आलेल्या ‘एकटी’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर ‘रजतकमल’ देऊन सन्मानित करण्यात आले.
ठाकूर यांनी हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांना ‘धनंजय’ या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत संधी दिली. त्यांनतर त्यांनी ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून १९७५ मध्ये ‘जख्मी’ या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट मुंबईत ४० आठवडे एकाच चित्रपटगृहात चालला.
यानंतर ‘रईसजादा’ या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
१९७५ : चित्रपट दिगदर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन ( जन्म :२६ नोव्हेंबर, १९२३ )
- घटना :
१८२१ : पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले
१९४३ : दुसरे महायुद्ध – रॉयल एरफोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्ब हल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
१९७६ : चीनच्या तांगशान परिसरात झालेल्या भूकंपात २४२,७६९ नागरिक मृत्युमुखी पडले तर १६४,८५१ नागरिक जखमी झाले.
१९७९ : भारताच्या ५ व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.
२०१८ : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून कोकण कृषी विद्यापीठ कचेरीतील 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली.
• मृत्यू :
•१९८१ : नाटककार बाबुराव गोखले यांचे निधन ( जन्म : १९ सप्टेंबर, १९२५ )
- १९८८ : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथे हत्या. ( जन्म : ३१ डिसेंबर, १९६२ )
- जन्म :
१९०७ : तमिळ चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व ‘एव्हीएम प्रॉडक्शन्स’ या चित्रपट निर्मिती कंपनीचे संस्थापक अविची मैयप्पा चेट्टियार यांचा जन्म (मृत्यू : ऑगस्ट १२, १९७९)
१९०९ : भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल कसू ब्रम्हानंद रेड्डी यांचा जन्म ( मृत्यू : २० मे, १९९४ )
१९४६ : उर्दू शायरी लेखक फ़हमीदा रियाज़ यांचा जन्म . गोदावरी, ख़त-ए-मरमुज़ हे त्यांचे प्रमुख कथा संग्रह आहेत.
१९४७ : ठाण्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारे खासदार प्रकाश परांजपे यांचा जन्म ( मृत्यू : २० फेब्रुवारी, २००८ )