शेतकऱ्यांची थकबाकी दीड महिन्यात चुकती करणार : टोकाई चेअरमन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे २३ कोटी रुपयांचे जे काही देणे आहे, ते सर्व येत्या दीड महिन्यात चुकते करणार आहोत, अशी हमी टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. शिवाजीराव जाधव यांनी दिली आहे.

वसमत येथील (जि. हिंगोली) टोकाई साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढल्याने हा कारखाना अचानक चर्चेत आला.

या पार्श्वभूमीवर ‘शुगरटुडे’ने चेअरमन ॲड. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘यंदा आमच्या कार्यक्षेत्रात खूपच कमी ऊस झाला. त्यामुळे गाळपाला मोठा फटका बसला. २३ कोटींची रक्कम बाकी आहे. आम्ही केंद्राच्या ‘एनएसडीसी’कडे अर्ज केला आहे. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. सुमारे ४० कोटींचे कर्ज आम्ही घेत आहोत. त्यामुळे येत्या एक ते दीड महिन्यात आम्ही शेतकऱ्यांची सर्व थकबाकी देऊन टाकू.’

साखर आयुक्तालयाच्या फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार कारखान्याने ५७ टक्के रक्कम एफआरपीपोटी दिली आहे.

‘आमच्या कारखान्यासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. हा कारखाना १७ वर्षे बंद होता. आम्ही पुढाकार घेऊन २०१५ साली तो सुरू केला. तेव्हापासून कारखाना उत्तमपणे सुरू आहे. यंदा आमचे गाळप खूपच कमी झाल्याने अडचण झाली. मात्र या अडचणीवर मात करू. कारण शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. गतहंगामापर्यंत आम्ही शेतकऱ्यांची सर्व देणी चुकती केलेली आहेत. ही अडचण याच हंगामात आली आहे’, असे ॲड. जाधव म्हणाले.


जप्तीचा प्रश्नच नाही
या कारखान्याची मालमत्ता यापूर्वीच राज्य सहकारी बँकेकडे तारण आहे. त्यामुळे ती आता जप्त करण्याचा किंवा लिलाव करण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासाही जाधव यांनी केला.
आम्ही साखर आयुक्तालय आणि राज्य सरकारला पत्र लिहून वेळ मागितली आहे. या संकटातून आम्ही लवकरच बाहेर पडू असा विश्वास आहे, असेही ॲड. जाधव म्हणाले.

आधीचे वृत्त

टोकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »