भाजप नेत्याच्या ताब्यातील साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश

हिंगोली : भाजप नेते शिवाजीराव जाधव हे चेअरमन असलेल्या जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे देणे द्यावे, असा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वसमत तालुक्यात हा कारखाना येतो. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या कारखान्याने सुमारे एक लाख मे, टन ऊस गाळप केल्याचे सांगण्यात येते. त्यापोटी कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे २३ कोटी रुपये देणे लागतो. मात्र सध्याची कारखान्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, ही रक्कम देणे अशक्य असल्याचे पत्र अध्यक्ष जाधव यांनी साखर आयुक्तांना लिहिले होते.
या पत्राची गंभीर दखल घेऊन साखर आयुक्तांनी, एका आदेशाद्वारे टोकाई साखर कारखाना जप्त करून, त्याच्या मालमत्तेच्या लिलावातून शेतकऱ्यांचे देणे फेडावे, असे हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वसमत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती कारखान्याच्या मालमत्तेची आणि सर्व व्यवहारांची माहिती घेईल आणि पुढील कार्यवाही करेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव जाधव यांनी सांगितले की, आम्ही केंद्र सरकारकडे कर्ज प्रस्ताव दिला आहे. तो नक्की मंजूर होईल याची आम्हाला खात्री आहे. ती रक्कम मिळाल्यानंतर आम्ही सर्व थकबाकी देऊन टाकू, शेतकऱ्यांचा एक पैदेखील ठेवणार नाही.
[…] टोकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीच… […]