ट्रॅक्टरने केला घात, गाढ झोपलेले ऊसतोड मजूर पती-पत्नी ठार
पुणे : ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उसतोड मजुरांच्या कोपीत शिरल्याने कोपीत झोपलेले पती-पत्नी जागीच ठार झाले. निर्वी (ता. शिरूर) येथील शिवारात १६ रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. गणपत कचरू वाघ (वय ४६) आणि शोभा गणपत वाघ (वय ४१, दोघेही मूळ रा. ममदापूर, ता. येवला, जि. नाशिक), अशी मृत्यू झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत.
या घटनेची फिर्याद दुर्दैवी गणपत वाघ यांचा मुलगा दीपक वाघ याने शिरूर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी एमएच-१२ ईबी ४५५८ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत वाघ हे एका साखर कारखान्यासाठी निर्वी गावच्या हद्दीत निर्वी गुनाट रस्त्यानजीक कणसे वस्ती परिसरात ऊसतोड करण्यासाठी आले होते. त्या परिसरातच ऊसतोड मजुरांनी राहण्यासाठी कोप्या उभारल्या आहेत. रविवारी (दि.१५) दिवसभर ऊसतोड केल्यानंतर ऊसतोडणी मजूर आपापल्या कोपीमध्ये झोपले होते. सोमवारी (दि.१६) पहाटे तीनच्या दरम्यान उसाने भरलेला एक ट्रॅक्टर वाघ यांच्या कोपीमध्ये शिरल्याचे ऊसतोड मजूरांना आढळून आले. तसेच गणपत वाघ व त्यांची पत्नी शोभा वाघ यांच्या अंगावर ट्रॅक्टरचे चाक गेल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.
शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके तपास करीत आहेत.