साखर कामगारांच्या वेतनवाढीवर फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय

मुंबई – साखर कामगारांची वेतनवाढ व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी गठीत केलेल्या त्रिपक्षीय समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत साखर कामगारांच्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा झाली. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व मागण्यांवर समाधानकारक तोडगे काढण्यावर बैठकीत एकमत झाले.
साखर कामगार संघटनेने ४० टक्के वेतनवाढीची मागणी केलेली आहे. यामुळे सध्या साखर कारखान्यांत कामगारांचे थकीत वेतन इत्यादी बाबतची माहिती संकलित करून पुढील बैठकीस सादर केली जाईल, महिना अखेरीस परत बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरले.
त्रिपक्षीय समितीच्या बैठकीस समितीचे अध्यक्ष पी.आर. पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री राजेश टोपे, संगमनेर कारखान्याचे चेअरमन प्रताप ओव्हाळ, खासगी कारखान्याचे प्रतिनिधी अविनाश जाधव, कामगार संघटनेचे प्रतिनिधी तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, राऊ पाटील, अविनाश आपटे, आनंदराव वायकर, पी. के. मुडे, सत्यवान शिखरे, शिवाजी औटी, प्रदीप बनगे, राजेंद्र तावरे, डी एम निमसे, युवराज रणवरे, मुळा कारखाना साखर कामगार युनियन चे अध्यक्ष अशोकराव पवार, तर शासन प्रतिनिधी त्रिपक्षीय समितीचे सदस्य सचिव कामगार कल्याण आयुक्त रविराज ईळवे, साखर आयुक्त कुणाल खेमनार हे बैठकीस ऑनलाईन हजर होते.
किमान चार बैठकीमध्ये वेतनवाढ व इतर मागण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले. या चारही बैठका फेब्रुवारी अखेर घेण्याचे ठरले. या बैठकीत साखर उद्योगा पुढील अडचणी व साखर कामगाराचे वेतन वाढ व प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा समाधानकारक झाल्यानंतर सभेचे कामकाज संपविण्यात आले व पुढील बैठकीची वेळ, तारीख, ठिकाण समितीचे सदस्य सचिव सर्वांना कळविण्यात येईल, असे डी एम निमसे म्हणाले.