साखरेसह ट्रकची चोरी; चालक पोलिसांच्या ताब्यात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

श्रीरामपूर : भोकरदनमध्ये ट्रान्सपोर्टचालकानेच १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर परस्पर विक्री केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपूरमध्येही चालकाकडून साखरेसह चक्क ट्रकचीही चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर येथे २४ टन साखर पोहोचविण्याची ऑर्डर असताना चालकाने ट्रकची चोरी करत तो थेट गुजरातला नेला होता.

याबाबत श्रीरामपूर पोलिसांत तक्रारीनुसार अपहार केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याचा अधिक तपास करत सदरचा ट्रक व्यारा (जि. वापी, गुजरात) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चालकासह ताब्यात घेतला. तसेच ट्रक व साखर, असा एकूण साडेअठ्ठावीस लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, श्रीरामपूर येथील न्यू अमर ट्रान्स्पोर्टचे मालक इम्रान पोपटिया यांना श्रीरामपूर येथील साखरेचे व्यापारी श्याम ठक्कर यांनी २४ टन साखर उल्हासनगर येथील माँ ट्रेडर्सकडे पोहोच करण्याची ऑर्डर दिली होती. पोपटिया यांनी त्यासाठी ओळखीचे तुकाराम फुंदे यांचा ट्रक (एमएच ४६, एफ-५५७३) ऑर्डर पाठविण्यासाठी मागवला होता. ट्रकचालक सुदामा घनश्याम किरार (रा. परवार, ता. फतेगढ, जि. गुणा, मध्यप्रदेश) यास ट्रकमध्ये २४ टन साखर भरून दिली. सदरची साखर उल्हासनगर येथील माँ ट्रेडर्सकडे खाली करण्यास सांगितले. साखरेचा ट्रक १३ एप्रिलला माँ ट्रेडर्स येथे पोहचणे अपेक्षित असताना तो तेथे पोहचलाच नाही. त्यामुळे चालकाला फोन केला असता त्याने फोन बंद केल्याचे लक्षात आले. त्यानंतर ट्रकचे जीपीएस लोकेशन तपासले असता, ते बंद केल्याचे लक्षात आले. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपासासाठी पथकाची नियुक्ती केली होती. पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता ट्रक व्यारा (गुजरात) येथे असल्याचे समोर आले. पथकाने व्यारा गाठत चालकासह ट्रक ताब्यात घेतला. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचा ट्रक, ८ लाख ५० हजार रुपये किमतीची साखर, असा एकूण २८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »