अथणीत ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिलांचा जागीच मृत्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अथणी : ऊस गोळा करताना ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना अथणी तालुक्यात बुधवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. बौरव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) व लक्ष्मीबाई मल्लप्पा रुद्रगौडर (वय ६५, दोघीही रा. सत्ती, ता. अथणी) अशी या महिलांची नावे आहेत. दोन महिला मजुरांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अथणी तालुक्यात गेल्या महिन्यात ऊसतोड यंत्रामध्ये सापडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. सप्तसागर येथे २१ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. आतापर्यंत तीन महिलांचा मृत्यू झाल्याने सुरक्षेच्या उपाययोजनेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

सविस्तर वृत्त असे की,  सत्ती गावाच्या बाहेरील शेतात ऊस तोडणीचे काम सुरू होते. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऊसतोड यंत्राच्या मागील बाजूस तोडलेला ऊस गोळा करण्याचे काम बौरव्वा व लक्ष्मीबाई करत होत्या.अचानक त्या ऊसतोड यंत्रात अडकल्या. यंत्र बंद करण्यापूर्वीच दोघींना गंभीर इजा होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ही घटना अथणी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली असून, याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »