उदगिरी शुगरचे सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने यंदाच्या गळीत हंगामासाठी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी केली. ते बाराव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभात बोलत होते.
माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते आणि चेअरमन डॉ. राहुल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. यावेळी श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर निवास पवार यांनी सपत्निक केली. पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास पाठवावा, असे आवाहनही डॉ. शिवाजीराव कदम यांनी केले.
कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम म्हणाले, ‘यावेळी कारखाना दररोज ५ हजार मे. टनाने ऊस गाळप करणार आहे. तसेच इथेनॉलकरिता असलेली मागणी विचारात घेता इथेनॉल प्रकल्पाची क्षमता १ लाख ५० हजार लिटर्स प्रति दिन करण्यात आली आहे.’
आभार प्रल्हाद पाटील यांनी मानले.