देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हे कारखान्याच्या या प्रकल्पामुळे साखर उद्योगाला दिशा : अमित शहा
अहिल्यानगर :सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी ग्रुप यांचा देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीएनजी प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्यूअल या दोन्ही ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी दुपारी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोपरगाव येथील संजीवनी विद्यापीठाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नितीन कोल्हे, सिंधूताई कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, रेणुका कोल्हे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हे कारखान्याचा नवा आदर्श : अमित शहा
याप्रसंगी अमित शहा म्हणाले की, आपला देश जगात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी भारतीयांनी स्वदेशीचा वापर वाढविला पाहिजे. सीएनजी व पोटॅश खत हे बाहेरच्या देशात मिळते, पण कोल्हे कारखान्याने ते तयार करण्याचा नवा ऐतिहासिक प्रकल्प उभा करून देशातील तमाम सहकारी साखर कारखान्यांना दिशा देण्याचे कार्य केले आहे. याच धर्तीवर देशात १५ सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. स्वदेशीच्या वापरातून देशाला स्वयंपूर्ण करण्याचे व देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पहिल्या तीन क्रमांकात आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्याची सुरुवात कोल्हे कारखान्याच्या माध्यमातून विवेक कोल्हे यांनी सुरू केली आहे. कारखान्यातील टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत उपयोगी पदार्थ बनवून देशातील सहकारी साखर कारखान्यांना नवा रस्ता दाखवून या प्रकल्पाच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण केला. तोट्यातील साखर कारखान्यांना या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. विदेशात मिळणारे पदार्थ कोल्हेंनी देशात निर्माण केल्याने स्वदेशीला चालना दिली. इथेनॉल प्रकल्प आता बहुआयामी करण्याची आवश्यकता आहे. सहकारी साखर कारखान्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था स्वीकारली पाहिजे. फळांच्या रसापासून इथेनॉल निर्मितीकडेही लक्ष दिले पाहिजे. फळांचे प्रोसेसिंग येथे झाले तर साखर कारखाने नफ्यात राहतील, असे त्यांनी नमूद केले. कोल्हे सहकारी साखर कारखान्याने हरित ऊर्जेसाठी काम केले आहे. प्राथमिक क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून बळकटीकरण, महिला बचत गटांचे जाळे अशा माध्यमातून संजीवनी उद्योग समूहाने वाटचाल सुरू ठेवली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. देशामध्ये डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता साधण्यासाठी केंद्र सरकारने दलहन आत्मनिर्भरता मिशन सुरू केले. त्यासाठी पुढील सहा वर्षांसाठी ११ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच नाफेड व एनसीसीएफकडे नोंदणी असलेल्या खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किमतीनुसार पिकांची खरेदी केली जाणार आहे. केंद्र सरकारने मसूर, मूग, मोहरी, हरभरा, तुरीसह ज्वारी, सोयाबीन, कापूस व गहू यांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.