उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा : जयंत पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इस्लामपूर : शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्यावर राजारामबापू साखर कारखाना, अॅग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके, बारामती) व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे) यांच्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते.

‘एआय’ तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास एका बाजूला उत्पादनात ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन दुसऱ्या बाजूला पाणी, खताची बचत होते. जमिनीची सुपिकता टिकून राहते. यासाठी राजारामबापू साखर कारखाना पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादनही आमदार जयंत पाटील यांनी केले.

या चर्चासत्रादरम्यान ‘व्हीएसआय’च्या कृती गटाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जयंत पाटील यांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, ‘व्हीएसआय’चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, ‘केव्हीके’ चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे, ओंकार ढोबळे, ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. विवेक भोईटे म्हणाले, एआय तंत्रज्ञानात सॅटेलाईट, व्हेदर स्टेशन व सेन्सर यंत्रणेतून शेतकऱ्यांना मराठीतून अचूक माहिती दिली जाते. त्यातून पाणी, खत आणि किडींचे अचूक व्यवस्थापन होऊन उत्पादनात निश्चितपणे वाढ होते.

डॉ. अशोक कडलग म्हणाले, सध्या शेती करताना शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने, अडचणी आहेत. यावर मात करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »