‘हुतात्मा’च्या चेअरमनपदी वैभव नायकवडी यांची बिनविरोध निवड
व्हाईस चेअरमनपदी रामचंद्र भाडळकर
वाळवा – पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वैभव नायकवडी आणि व्हा. चेअरमनपदी रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. वैभव नायकवडी यांची फेरनिवड झाली आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळामधून चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची सभा सोमवार दि. 22/01/2024 रोजी सकाळी 11.00 वा. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेस सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. निवडणूकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी वैभव नागनाथअण्णा नायकवडी व रामचंद्र ज्ञानदेव भाडळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने वैभव नायकवडी यांची कारखान्याच्या चेअरमनपदी व मा.रामचंद्र ज्ञानदेव भाडळकर यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे मावळे यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा मावळे यांनी पुष्पहार देऊन अभिनंदनपर सत्कार केला.
निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांनी हुतात्मा किसन अहिर, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळयास पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी व स्व.कुसूमताई नायकवडी यांच्या समाधीस अभिवादन केले. यानंतर झालेल्या सभेत गौरव नायकवडी, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विरधवल नायकवडी, नंदकुमार शेळके व प्रा.विनय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन मा.वैभवकाका नायकवडी म्हणाले, सर्व सभासद शेतक-यांनी चांगले काम करणेसाठी कारखान्याच्या कामकाजात आपला सहभाग वाढवावा. ऊसाबरोबर पाचट आलेने साखरेचा लॉस होऊन कारखान्याचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे ऊसाबरोबर पाचट येऊ देऊ नये, आपल्या कारखान्याने चांगले काम केलेने आपणास राज्य व देशपातळीवरील 50 पेक्षा जास्त पारितोषिक मिळालेली आहेत.
परिस्थितीप्रमाणे गेल्या 4 ते 5 वर्षात साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर पडले, त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका बसला, बेकारांच्या हाताला काम देणेसाठी आपणास काही नवनवीन प्रकल्प उभारावे लागतील. आर्थिक काटकसर करुन कारखान्याचा कारभार करावा लागेल. ज्या भरवशाने, विश्वासाने आम्हा नवीन संचालकांना निवडून दिल्याबद्दल, कार्यकर्त्यांनी प्रचारात मेहनत-कष्ट घेतल्याबद्दल वैभवकाका यांनी सर्वांचे आभार मानले.
मावळे यांनी कारखान्याच्या निवडणूकीचे कामकाज चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल त्यांचा नायकवडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.समीर सलगर, सेक्रेटरी मुकेश पवार आदी उपस्थित होते.