एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नाही : ‘विघ्नहर’अध्यक्ष शेरकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साधारण १५ मेपर्यंत विघ्नहर साखर कारखाना सुरू राहणार असून, नोंदलेल्या उसापैकी एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नसल्याचे विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

जुन्नर तालुक्यामधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने दि. ४ एप्रिलअखेर ७ लाख ३८० मे. टन उसाचे गाळप केले असून, ७ लाख ६२ हजार ५०० पोती साखर उत्पादित झाली आहे व साखरेचा सरासरी उतारा ११.०२ टक्के इतका आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

सत्यशील शेरकर म्हणाले की, २०२४-२५ या गाळप हंगामाचा १३२ वा दिवस आहे. अद्याप २६२३ हेक्टर नोंदलेल्या उसाची तोडणी करणे बाकी आहे. यंदाच्या वर्षी कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम झाल्याने काही प्रमाणात ऊसतोडणीवर परिणाम झाला.  कारखान्याच्या विस्तारीकरणाचा फायदा पुढील वर्षाच्या गाळप हंगामासाठी होणार असून, पुढील वर्षी सर्व उसाची तोडणी वेळेवर होण्यास फायदा होणार आहे.

यंदाच्या गळीत हंगामात ऊसतोडणीला उशीर होऊ नये म्हणून कारखान्याने १ लाख ४६ हजार २२५ मे. टन ऊस बाहेरच्या कारखान्याला गाळपासाठी दिला आहे. आता उर्वरित उसाची तोडणी विघ्नहर कारखाना स्वतः करणारा असून, मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व उसाचे गाळप करण्याबाबतचे नियोजन झाले आहे. उन्हाळा कडक असल्यामुळे ऊसतोडणी मजूर उसाची तोडणी संथगतीने करीत आहेत. त्यामुळे याचा गळीत हंगामावर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »