‘विघ्नहर’ १५ मे पर्यंत सुरू राहणार : भास्कर घुले

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत साडेचार लाख टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केले आहे. ४ लाख ६५ हजारवर साखर पोती उत्पादित झाली आहेत. सरासरी उतारा १०.४५ टक्के इतका आला आहे. या हंगामात कारखाना १० लाख टन उसाचे गाळप करेल, त्यासाठी १५ मे पर्यंत आमचा गाळप हंगाम सुरू राहील, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी दिली.
विघ्नहरकडून क्रमवारीने उसाची तोडणी केली जाते. एखाद्या शेतकऱ्याचा ऊस शॉर्टसर्किटने अथवा वेगळ्या काही कारणाने जळीत झाल्यास त्याची तोडणी अग्रक्रमाने केली जाते. संचालक मंडळांने ठरविलेल्या स्लॅबनुसार ऊस बिलातून जळीत उसाची कपात केली जाते. २०२५-२६ या गळीत हंगामासाठी उसाची लागवडदेखील चांगल्या प्रमाणात होत आहे, असे घुले यांनी सांगितले.
ऊसतोडणी व लागवडीबाबत कारखाना अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब करीत असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोबाईलवर माहिती दिली जात आहे. गाळपाला आलेल्या उसाचेदेखील पेमेंट शेतकऱ्यांना वेळेत कसे मिळेल याकडे आमचा कटाक्ष असतो, असेही घुले यांनी सांगितले.