उत्पन्नाची शाश्वती देणारे ऊस हेच एकमेव पीक : ‘विघ्नहर’चे अध्यक्ष शेरकर
पुणे : कांदा, भाजीपाला, फुले आदींच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळेल याची शाश्वती नाही; मात्र उसाला किती दर मिळणार हे शेतकऱ्याला आधीच निश्चितपणे माहिती असते, भविष्यात उसाला प्रतिटन रुपये ३००० पेक्षा कमी बाजारभाव मिळणार नाही. त्यामुळे शाश्वत उत्पन्न असलेल्या उसाची शेतकऱ्यांनी अधिकाधिक लागवड करावी, असे आवाहन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशीलदादा शेरकर यांनी केले.
पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथे कारखान्याने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले आणि अन्य अधिकारी, संचालक मंडळ उपस्थित होते.
अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले की, भविष्यकाळात कारखान्याची गाळप क्षमता ७५०० टन प्रति दिन करणार आहोत. भविष्यात पाणीप्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे १८० दिवसांऐवजी १२० दिवसांत गाळप पूर्ण केले जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर वाढवावा. हिरवळीच्या खतांचा वापर करण्याबरोबरच शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांचा वापर, पाणी व किडरोग व्यवस्थापन केल्यास प्रति एकरी भरघोस ऊस उत्पादन मिळेल.
यावेळी कृषीभूषण संजीव माने, ‘विघ्नहर’चे उपाध्यक्ष अशोक घोलप, जुन्नर बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हा बँकेचे संचालक तुळशीराम भोईर, शरद लेंडे, सचिव अरुण थोरवे, मुख्य शेतकी अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.
ऊस उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय व जैविक खतांचा जास्तीत जास्त प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन करून, जमिनीची सुपीकता, ऊस लागणीची योग्य वेळ, रासायनिक खतांच्या मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन या पंचसुत्री व्यवस्थापनाविषयी संजीव माने यांनी मार्गदर्शन केले.
अंकुश आमले, ज्ञानेश्वर खंडागळे, अनंत चौगुले, दांगट आदींनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेतकी अधिकारी संदीप जाधव व गणेश मोढवे यांनी केले. आभार उपाध्यक्ष घोलप यांनी मानले.